अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांसह तीनजणांवर हल्ला

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांसह तीनजणांवर हल्ला

कुपवाड - येथील रामकृष्ण-नगरमधील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांसह तिघांना शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. संशयितांनी तलवार घेऊन पाठलाग केला. 

याप्रकरणी रणजित महादेव माहिमकर (वय २२), विद्या महादेव माहिमकर (वय ४६, दोघे रा. रामकृष्णनगर) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्यासह मारहाणीचा गुन्हा कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. सहायक आयुक्त गौतम तुकाराम भिसे (वय ५७) यांनी फिर्याद दिली. 

रामकृष्णनगरमधील सर्व्हे क्रमांक ३०२/अ/२ येथील मिळकतीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार कुपवाड महापालिकेत दाखल झाली होती. रणजित हा शिक्षण घेतो, तर त्याची आई गृहिणी आहे. रणजितच्या आत्याने तक्रार दिल्यानंतर आज तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी सहायक आयुक्त भिसे यांसह शाखा अभियंता ए. पी. मगदूम, स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी घटनास्थळी गेले.

रणजित माहिमकर आणि विद्या माहिमकर तेथे उपस्थित होते. पथकाने बांधकाम परवान्याची मागणी केल्यावर रणजितने ‘तू कोण मला विचारणारा?’ असे म्हणून भिसे यांना धक्काबुक्की केली. त्यात त्यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर मगदूम आणि मद्रासी तेथे धावले. त्यावेळी रणजित शेडमध्ये ठेवली तलवार घेऊन बाहेर आला. तलवार पाहताच दोघांनीही पळ काढला. रणजित त्यांच्या मागे धावला. आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी केली. तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान, भिसे यांनी कुपवाड पोलिसांशी संपर्क साधला. दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांत जाल, तर विनयभंगाचा आरोप...
भिसे आणि त्यांच्या पथकाला विद्या माहिमकर हिने शिवीगाळ करून ‘पोलिसांत गेला, तर विनयभंगाची तक्रार करू’, अशी धमकीही दिली. दिवसाढवळ्या हा प्रकार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com