मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याने आईवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

सांगली - मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सौ. सुनीता रामचंद्र चव्हाण (वय 40) यांच्यावर चाकूने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कापूसखेड (ता. वाळवा) येथे 30 डिसेंबरला रात्री घडला. जखमी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तब्बल 370 टक्के घालून डॉक्‍टरांनी प्राण वाचवले. या भयानक प्रकारानंतर दोन दिवस उलटले तरी इस्लामपूर पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने आमदार विद्या चव्हाण यांना हा प्रकार कळवला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली.

सांगली - मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या सौ. सुनीता रामचंद्र चव्हाण (वय 40) यांच्यावर चाकूने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कापूसखेड (ता. वाळवा) येथे 30 डिसेंबरला रात्री घडला. जखमी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तब्बल 370 टक्के घालून डॉक्‍टरांनी प्राण वाचवले. या भयानक प्रकारानंतर दोन दिवस उलटले तरी इस्लामपूर पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने आमदार विद्या चव्हाण यांना हा प्रकार कळवला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली. आज त्यांनी चव्हाण यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जबाब घेतला. 

सौ. सुनीता याची अल्पवयीन मुलगी गुरुवारी डेअरीत दूध घालण्यास गेली होती. तेव्हा गावातील अमोल कोळी व साथीदारांनी तिची छेड काढली. तिने आईला हा प्रकार सांगितला. 30 रोजी रात्री 8.30 वाजता सुनीता यांनी मुलीच्या छेडछाडीबद्दल जाब विचारला. तेव्हा कोळी आणि साथीदारांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. सुनीता यांच्या पोटावर, मांडीवर, डोक्‍यावर सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पळाले. जखमी सौ. सुनीता यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सांगलीत खासगी रुग्णालयात आणले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सिव्हिलमध्ये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना दाखल केले आहे. 

सिव्हिलमधील डॉक्‍टरांनी रात्री 12 ते पहाटे अडीच वाजेपर्यंत शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले. पोटाची आतडीच बाहेर आल्यामुळे स्थिती गंभीर होती. तब्बल 370 टाके घालण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेच्या अध्यक्षा लीलाताई जाधव यांना हा प्रकार समजला. त्यांनी शनिवारी सकाळी सिव्हिलमध्ये धाव घेऊन माहिती घेतली. इस्लामपूर पोलिसांना हा प्रकार कळवला. परंतु पोलिसांनी मुख्यमंत्री दौऱ्यावेळी बंदोबस्ताचे कारण सांगून दखलच घेतली नाही. त्यामुळे सौ. जाधव यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याशी संपर्क साधून हकिकत सांगितली. त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याशी आज संपर्क साधला. त्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले. दुपारी त्यांनी सांगलीत सिव्हिलमध्ये येऊन सौ. सुनीता यांचा जबाब घेतला. 

ठाणे अंमलदार चहाला... 
खुनी हल्ल्याची माहिती इस्लामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी कळवली. तेव्हा "ठाणे अंमलदार चहाला गेलेत' असे उत्तर देण्यात आल होते. अधिकारी कोठे गेलेत? विचारले, तर ते बंदोबस्तात असल्याचे उत्तर मिळाले. काल दिवसभर पोलिस फिरकलेच नाहीत. त्यानंतर आज इस्लामपूर पोलिस सिव्हिलमध्ये दाखल झाले. 

आरोपींना अटकेची मागणी 
श्रमिक संघटनेच्या महिलांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. संशयित आरोपी अमोल कोळी व साथीदारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. लीलाताई जाधव, चंपाताई जाधव, जयश्री सावंत, कमल शिर्के, मंगल पाटील, गीता ठक्कर, आशा फडणवीस, सरिता कदम, भागीरथी दळवी आदी उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना सोमवारी भेटणार असल्याचेही सौ. जाधव यांनी सांगितले. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 

Web Title: attack on mother