राहुरीत दरोडेखोरांकडून पोलिसांवरच हल्ला 

विलास कुलकर्णी 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सशस्त्र दरोडेखोरांची टोळी व पोलिस पथक यांच्यात धुमश्‍चक्री झाली. पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून, टोळी पळाली. त्यांचा पाठलाग करून, शहरात विविध ठिकाणी चार अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली.

राहुरी : राहुरी शहरात आज (सोमवारी) पहाटे दरोडेखोरांच्या टोळी संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी सव्वातीन वाजता पोलिस पथक गेले. पोलिस पथक पाहताच दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढविला. यात दरोडेखोर व पोलिसांत धुमश्‍चक्री झाली. याचा फायदा घेत टोळीतील दरोडेखोर पसार होऊ लागले मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळविले. पसार असलेल्या दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. 

सशस्त्र दरोडेखोरांची टोळी व पोलिस पथक यांच्यात धुमश्‍चक्री झाली. पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून, टोळी पळाली. त्यांचा पाठलाग करून, शहरात विविध ठिकाणी चार अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. सकाळी सात वाजेपर्यंत ही धरपकड सुरू होती. दरोड्याचे साहित्य, दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एका चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले. 

सागर गोरख मांजरे (वय 22, रा. पाईपलाईन रस्ता, यशोदानगर जवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा.भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत. 

आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, एक ऑक्‍सिजन गॅस सिलेंडर, एक तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, एक आगपेटी, चार मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. 

पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी माहिती देतांना सांगितले की, गोकुळ कॉलनी येथे आज पहाटे तीन वाजता एका मोबाईल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी उभी असल्याची माहिती राहुरी पोलिस ठाण्यात समजली. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

दोन दुचाकी, एक चार चाकी वाहन व दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारी होती. पोलिस पथकाला पाहिल्यावर जवळच असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यातून विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेने फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली. पळतांना एक जण तोंडावर आपटला. त्यास घटनास्थळापासून जवळच पोलिसांनी पकडले. 

दरोडेखोरांचा पोलिस पथकाने पाठलाग सुरू केला. एकाला व्यापारी पेठ, एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्‍टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले. चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले. दरोडेखोरांचा म्होरक्‍या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालाणी यांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातून दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर कारागृहातून सुटलेला आहे. त्याच्यावर श्रीरामपूर, तोफखाना (नगर) व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी राहुरी एमआयडीसी जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानातून गॅस कटर व सिलेंडर चोरल्याची कबुली मांजरे याने दिली. इतर तीन दरोडेखोरांवरील गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही पोलिस उपअधीक्षक मदने यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on police by robbers