(व्हिडिओ) : "टोल'नाक्‍यावरील कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला

आनंद गायकवाड
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुण्याहून आलेल्या निळ्या ट्रकने सोमवारी (ता. दोन) दुपारी सव्वातीनच्या सुमारास हिवरगाव पावसा येथील "टोल'नाक्‍यावरील गेटचे दांडके तोडले. त्यातून सुरक्षारक्षक शैलेश फटांगरे व ट्रकचालक यांच्यात बाचाबाची झाली.

संगमनेर : तालुक्‍यातील हिवरगाव पावसा येथील "टोल'नाक्‍यावर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर सोमवारी (ता. दोन) दुपारी मोठ्या हाणामारीत झाले. संगमनेरमधील काही तरुणांनी येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करताना, एकावर चाकूने वार केले. या घटनेत नवनाथ अण्णासाहेब घुले (वय 32, रा. गुंजाळवाडी, संगमनेर) व शैलेश फटांगरे (रा. वरुडी पठार, संगमनेर) जखमी झाले आहेत. 

हेही वाचा - साईमंदिरातील व्यवस्थापनावर "रिसर्च'; धक्कादायक निष्कर्ष समोर 

अशी घडली घटना 

पुण्याहून आलेल्या निळ्या ट्रकने सोमवारी (ता. दोन) दुपारी सव्वातीनच्या सुमारास हिवरगाव पावसा येथील "टोल'नाक्‍यावरील गेटचे दांडके तोडले. त्यातून सुरक्षारक्षक शैलेश फटांगरे व ट्रकचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हे प्रकरण तेथेच मिटले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत संगमनेरहून आलेल्या चार तरुणांनी "टोल'नाक्‍यावरील नवनाथ घुले यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. आरोपी जावेद शेख याने चाकूने घुले यांच्यावर वार केले. त्यात घुले यांच्या उजव्या डोळ्यावर, पाठ, पोट व डाव्या पायाच्या पोटरीला जखम झाली आहे.

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या शैलेश फटांगरे यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पळून गेले. मारहाणीचा हा प्रकार "टोल'नाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी घुले यांना उपचारासाठी तातडीने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

navanath ghule

जखमी नवनाथ घुले

हेही वाचा - ...आणि शिर्डीत उडत्या हेलिकॉप्टरमधून उतरले कमांडो

आरोपींची नावे 

याबाबत जखमी नवनाथ घुले यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शहेबाज नजीर इनामदार, आवेश अजीजअली शेख, जावेद अब्दुल रज्जाक शेख (रा. देवी गल्ली, संगमनेर), मुस्तफा मुख्तार पठाण ऊर्फ बाबू (रा. खांडगाव, ता. संगमनेर) व मजहर युनूस सय्यद (रा. लक्ष्मीपुरा, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on the staff of Tolnaka