खंडणीसाठी टीव्ही मालिकेच्या सेटवर हल्ला 

राजेश मोरे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - केर्ली (ता. करवीर) येथे सुरू असणाऱ्या "जुळता जुळता जुळतय की' या टीव्ही मालिकेच्या सेटवर खंडणीसाठी केर्लीचे उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी धिंगाणा घातला. शुटींगच्या साहित्यासह, मोटारीची तोडफोड केली.

कोल्हापूर - केर्ली (ता. करवीर) येथे सुरू असणाऱ्या "जुळता जुळता जुळतय की' या टीव्ही मालिकेच्या सेटवर खंडणीसाठी केर्लीचे उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी धिंगाणा घातला. शुटींगच्या साहित्यासह, मोटारीची तोडफोड केली. त्याचबरोबर दिग्दर्शकास मारहाण करून त्याला धमकी देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी उपसरपंच अमित पाटीलसह नऊ जणांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. 

अटक केलेल्या संशयितांची नांवे - 

उपसरपंच अमित भिमराव पाटील (वय 36), दगडू देवाप्पा कांबळे (वय 59), किरण सुरेश कांबळे (वय 26), चंद्रकांत मारुती कोपार्डे (वय 33), अक्षय हंबिरराव पाटील (वय 26), अवधुत हंबिरराव पाटील (वय 22), अमित पंडित मोहिते (वय 33), कपील आकाराम माने (वय 29), रवींद्र आनंदा पाडेकर (वय 33 सर्व रा. केर्ली, ता. करवीर) 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, केर्ली (ता. करवीर) या गावात "कॅप्टन माने' बंगला आहे. या बंगल्यात गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील "सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' निर्मित जुळता जुळता जुळत की या टीव्ही मालिकेचे शुटींग सुरू आहे. रवींद्र सिद्धू गावडे (वय 36, रा. हॉकी स्टेडिअम परिसर) हे त्याचे प्रोडेक्‍शन हेड म्हणून काम पाहतात. मुंबईतील गौतम कोळी हे दिग्दर्शक म्हणून काम करतात. 

उपसरपंच पाटीलने गावात चित्रिकरण करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अशी मागणी निर्मिती प्रमुख रवींद्र गावडे यांच्याकडे केली. पण खंडणी स्वरुपातील रक्कम देण्यास गावडे यांनी नकार दिला. याचा राग पाटीलला आला. काल रात्री पावणे दहाच्या सुमारास येथील माने बंगल्यात शुटींग सुरू होते. मालिकेत महिला कलाकारांसह इतर कालाकार काम करत होते. त्याठिकाणी कोळी हे दिग्दर्शकाची जबाबादरी सांभाळत होते. 

दरम्यान या बंगल्यात उपसरपंच पाटील साथिदारासह घुसले. त्यांनी सेटवरील लाईट व फ्रेम पाडून शुटींग बंद पाडले. त्यानंतर दिग्दर्शक कोळी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांची बंगल्या बाहेर उभी असणाऱ्या आलिशान मोटीरीची तोडफोड केली. आरडाओरडा करत त्यांनी धिंगाणा घालण्यास सुरवात केली. हा प्रकार पाहून सेटवरील कलाकारांसह कर्मचारी घाबरून गेले. त्यांनी बंगल्यातील एका खोलीची आसरा घेत त्यांनी स्वतःला कोंडून घेतले. त्यात महिला कलाकारांचाही समावेश होता. निर्मिती प्रमुख गावडे यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी काळे यांनी धाव घेतली. त्याठिकाणी दोन हल्लेखोर त्यांच्या हाती लागले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून कलाकार व कर्मचाऱ्यांना शांत केले. त्यानंतर शुटींग थांबविण्यात आले. 

याबाबत निर्मिती प्रमुख रवींद्र गावडे यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी उपसरपंच अमित पाटीलसह दगडू कांबळे, किरण कांबळे, चंद्रकांत कोपार्डे, अक्षय पाटील, अवधुत पाटील, अमित मोहिते, कपील माने आणि रवींद्र पाडेकर या नऊ जणांना अटक केली. त्यांच्यावर कलम 143, 147, 384, 452, 427, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पातळीवरून कारवाईची चर्चा 
हा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांसह चित्रीकरणाच्या टीमवर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. कारवाई होणार नाही, अशी शक्‍यता निर्माण झाल्यानंतर टीम प्रमुखांनी घडलेल्या प्रकाराची माहिती मुंबईतील वरिष्ठांना दिली. या वरिष्ठस्तरावरून झालेल्या हलचालीनंतर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली अशी चर्चा परिसरात सुरू होती. 

Web Title: attack on TV serial set