विखे पिता-पुत्रांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अध्यक्षपदावर दावा केला असून, काल भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अध्यक्ष भाजपचाच होणार असे विधान केल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. अध्यक्ष निवडीमध्ये विखे पिता-पुत्रांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे. 

नगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. या आखाड्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उडी घेतली आहे. "आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे. पक्षाने एकजुटीने प्रयत्न केल्यास हे शक्‍य आहे,' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामागे विखे पिता-पुत्रांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा या निमित्ताने रंगत आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांचा आश्‍चर्यकारक पराभव झाला. यावरून कर्डिले-विखेंमध्ये बिनसल्याचे बोलले 
जात आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच : कर्डिले 
राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी कारखान्यासंदर्भात जिल्हा बॅंकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यानंतर कर्डिले बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षाची मुदत संपली आहे. ग्रामविकास विभागातर्फे शनिवारी (ता. 21) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नोटीस जारी होणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी निवडप्रक्रिया पूर्ण होईल. राजकीय पक्षांकडून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

 

राजकीय चर्चांना उधाण 
मागील आठवड्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत भूमिका स्पष्ट केली. नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे सर्व घडत असताना भाजपतर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. मात्र, कर्डिले यांनी प्रथमच त्याबाबत भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An attempt to get the father and son into the fray