अतुल देऊळगावकर यांचे कोल्हापुरात शुक्रवारी व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

  • ‘सकाळ’चे संस्थापक - संपादक पत्रमहर्षी डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांची १२२ वी जयंती शुक्रवारी (ता. २०). 
  • यानिमित्ताने ‘सकाळ’ कोल्हापूर परिवारातर्फे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे ‘महापूर व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण’ या विषयावर व्याख्यान
  • राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृहात सायंकाळी साडेपाचला व्याख्यान. 

कोल्हापूर - ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक पत्रमहर्षी डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांची १२२ वी जयंती शुक्रवारी (ता. २०) सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्ताने ‘सकाळ’ कोल्हापूर परिवारातर्फे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे ‘महापूर व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण’ या विषयावर व्याख्यान होईल. राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृहात सायंकाळी साडेपाचला व्याख्यानाला प्रारंभ होणार आहे.

‘सकाळ’ने वर्धापन दिन आणि नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त तज्ज्ञांच्या व्याख्यानांची परंपरा जपली आहे. या परंपरेला आजवर अनेक नामवंत वक्‍त्यांची प्रभावळ लाभली. यंदा हीच परंपरा श्री. देऊळगावकर पुढे नेणार आहेत. ते २००६ पासून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सदस्य म्हणून तर फोरम ऑफ इन्व्हायरमेंटल जर्नालिस्ट इन इंडिया- ‘फेजी’चे सहचिटणीस म्हणूनही ते कार्यरत आहेत.

‘डळमळले भूमंडळ’, ‘लॉरी बेकर’, ‘स्वामीनाथन-भूकमुक्तीचा ध्यास’, ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची’, ‘विश्‍वाचे आर्त’, ‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’, ‘लॉरी बेकर ट्रूथ इन आर्किटेक्‍चर’, ‘विवेकियांची संगती’ या त्यांच्या पुस्तकांना मोठी मागणी असून ‘ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यांना अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असून राज्य पाठपुस्तक निर्मिती मंडळ, केंद्रीय रोजगार हमी योजना, राज्य भूजल कायदा सल्लागार मंडळ,  राज्य पंचवार्षिक योजना सिंचन गट, राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरही त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. परंपरेप्रमाणे नियोजित वेळेतच व्याख्यानाला प्रारंभ होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Devulgaonkar Lecture on Friday in Kolhapur