तंत्रज्ञानाचं युग संस्थांसह संस्कृतीही बदलेल - अतुल कहाते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत राहतील. एक निश्‍चित की तंत्रज्ञानाचा झपाटा मागे वळवता येणारा नसल्याने माणसालाच त्यावरची उत्तरे शोधावी लागतील,’’ असे मत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील मराठीतील आघाडीचे लोकप्रिय लेखक अतुल कहाते यांनी आज येथे व्यक्त केले. 

सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत राहतील. एक निश्‍चित की तंत्रज्ञानाचा झपाटा मागे वळवता येणारा नसल्याने माणसालाच त्यावरची उत्तरे शोधावी लागतील,’’ असे मत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील मराठीतील आघाडीचे लोकप्रिय लेखक अतुल कहाते यांनी आज येथे व्यक्त केले. 

‘सकाळ’ च्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘भविष्यातील कॅशलेस आणि अद्‌भुत जग’ या विषयावरील व्याख्यान ऐकण्यास समस्त सांगलीकरांची भावे नाट्यगृहात तुडुंब गर्दी झाली होती. सुमारे सव्वातासाच्या भाषणात श्री. कहाते यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेत विविध क्षेत्रांत उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या तंत्रज्ञानाची सफरच श्रोत्यांना घडवली. 

ते म्हणाले, ‘‘चाळीस वर्षांपूर्वी टॉफलर या भविष्यवेत्त्याने शेती, औद्योगिकीकरणानंतर मानवाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा सेवाक्षेत्राच्या विकासाचा असेल, असे भाकीत केले होते. आज ते तंतोतंत खरे ठरत आहे. १९८० पासून माहिती तंत्रज्ञान प्रसाराने या सेवाक्षेत्राच्या विकासाचा टप्पा सुरू झाला. आज ते तंत्रज्ञान रोबोटिक्‍स, जैवतंत्रज्ञान आणि नॅनो टेक्‍नॉलॉजी अशा पुढच्या टप्प्याच्या दिशेने गतीने जात आहे. प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल मानवी जीवन आमूलाग्र बदलून टाकत आहे. आज आपण विकास म्हणून ज्या कल्पना मांडत आहोत, त्याच कालबाह्य ठरण्याची चिन्हे आहेत.

चालकविरहित कारच्या अमेरिकेत चाचण्याही सुरू झाल्या आहेत. या कार्स विशिष्ठ मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना स्वतःहून पिकअप करतील. त्यामुळे आज उबरसारख्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या कामाचे स्वरूप किती मोठे असेल याचा अंदाज घेता येईल. आपल्याला जाऊ तिथे गाड्या उपलब्ध होणार असतील, तर मग स्वतःच्या वाहनांची गरजच काय?.. गाड्यांची गरजच कमी झाली तर वाढणाऱ्या प्रचंड रस्त्यांची गरजच काय?.. असे अनेक नवे प्रश्‍न तयार होतील. 

ते म्हणाले, ‘‘चीनने नऊ वर्षांत उभे केलेले पायाभूत विकासाचे जाळे आज अडगळीत जाण्याच्या टप्प्यावर आहे. मंदीने ग्रासलेल्या चीनमध्ये आज भुतांची शहरे, भुतांचे पूल तयार झालेत. नऊ वर्षांत चीनने तेल, लोखंड अशा नैसर्गिक संसाधनांचा केलेला वापर चीनच्या निर्मितीपासून झालेल्या वापरापेक्षा अधिक आहे. त्याचवेळी यापुढच्या काळात ज्याला इकॉनॉमीचा आधार मानत होतो, अशा इंधनासारख्या अनेक बाबींचा उपयोगच भविष्यात संपलेला असेल. सौदी अरेबियासारख्या देशातील तेल कंपन्यांनी इतिहासात प्रथमच आपले शेअर विक्रीस काढलेत. पवन आणि सौर ऊर्जेची निर्मिती इतकी असेल की वीज कंपन्यांना पुढे करायचे काय?.. असा प्रश्‍न पडेल. त्यामुळे हे तंत्र अधिक वेगाने पुढे येऊ नये असाही या कंपन्यांचा प्रयत्न सुरू आहे.’’

ते म्हणाले, ‘‘इंटरनेट ऑफ थिंक्‍स हा माहिती तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा आहे. ज्यात तंत्रज्ञान माणसाचे शरीर बदलून टाकेल. शरीराचे नियंत्रण छोटे रोबोट म्हणजेच ‘बॉट’ तयार करतील. रोबोटेक्‍स तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा व्हर्च्युअल रिॲलिटी आहे. हे तंत्र पर्यटन क्षेत्राच्याही मुळावर येईल. कारण माणूस जगातील कोणत्याही पर्यटनस्थळावर फिरल्याचा भास घरबसल्या करून घेईल. हेच तंत्र शिक्षणाच्या प्रचलित व्यवस्थेला तळातून बदलेल.

दूरशिक्षणाच्या क्षेत्रातील हे बदल शिक्षणासाठी उभारलेल्या इमारती आणि प्रयोगशाळांच्या अस्तित्व लयाला घालवू शकतात. जैवतंत्रज्ञानातील संशोधन शेतीला पार बदलून टाकणारे असेल. जेनिटिक्‍स तंत्र शेती उत्पादनाचे आडाखे बदलेल. शेतीसाठी जमिनीची गरजच उरणार नाही.

शहरांतही व्हर्टिकल शिवारे तयार होतील. जी अन्नाची गरज भागवतील. नॅनो टेक्‍नॉलॉजी मुलद्रव्यांत असे काही बदल घडवेल, की लोखंडाचा टिकाऊपणा असणारे मुलद्रव्य असेल, मात्र त्यात लोखंडाचे जडत्व असणार नाही. या टेक्‍नॉलॉजीचे रंग असेही असतील, की एकदा दिले तर पुन्हा इमारत रंगवावी लागणार नाही. इतकेच नव्हे तर पुन्हा या रंगातही आपल्याला हवे तसे बदल करता येतील. हवेत उडणाऱ्या गाड्याच तयार केल्या गेल्या तर रस्त्यांची गरजच उरणार नाही. जर्मनीतीतील हॅन ओव्हा येथे झालेल्या ‘थ्री डी प्रिटिंग प्रदर्शनात  चौथ्या औद्योगिकरण लाटेची चर्चा झाली. यात औद्योगिकरणाच्या प्रचलित सर्व व्यवस्थांना धक्का बसणार आहे.’’ 

‘जगणे सुखी असेल, की अनेक विकारांमुळे ग्रस्त’
कहाते म्हणाले, रोजगारापासून नवे प्रश्‍न ओघानेच तयार होतील. जसे मानवरहित बॅंक असेल तर, मग कर्मचाऱ्यांचे काय?.. या सर्वाचा एक टप्पा माणसाला कामच नसेल, असा असेल. कामच नसेल तर माणसाचे जगणे सुखी असेल की अनेक विकारांनी ग्रस्त. हेच जगणे वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानातील प्रगतीने अमरत्वाच्या दिशेने चाललेले असेल. कामच नसलेला अमर माणूस शेवटी करेल काय?.. हा पुढचा प्रश्‍न मानसिकतेपासूनचे अनेक प्रश्‍न तयार करेल.

तंत्रज्ञानातील बदल गुंता वाढवतील   
‘‘बंगळूरमध्ये दोन वर्षांपूर्वी आयटीतील तरुणांसाठी डीॲडिक्‍ट सेंटर सुरू करण्यात आले. आज ते फुल्ल झाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. आयटीतील टेक्‍नॉलॉजीतील ॲडिक्‍ट लोकांसाठी सेंटर सुरू झाले आहे. मानवी जीवनाचा गुंता सतत वाढवत नेणाऱ्या या बदलांची उत्तरे शोधावीच लागतील. तंत्रज्ञानाचे चक्र उलटे फिरणार नाही, हे सत्य आहे. त्यापासून कुणालाही पळ काढता येणार नाही.’’

Web Title: atul kahate speech in sangli