औरंगाबाद स्फोटकांचे कनेक्‍शन श्रीगोंद्यात

Crime
Crime

श्रीगोंदे - नायगाव (औरंगाबाद) येथून आठ दिवसांपूर्वी जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या 24 गोण्यांचे मूळ श्रीगोंद्यात निघाले आहे. औरंगाबाद पोलिसांनी आज स्थानिक पोलिसांची मदत घेत विविध ठिकाणी केलेल्या तपासणीनंतर शहरातून जिलेटिन जप्त करीत एकाला ताब्यात घेतले.

तेथील पोलिसांनी नायगावच्या मातोश्रीनगर येथून एका बंद खोलीतून 20 ऑक्‍टोबरला शुद्ध अमोनियम नायट्रेटच्या गोण्या जप्त केल्या होत्या. त्याचा वापर कशासाठी होतो, हे कोणीही सांगितले नाही; मात्र आज झालेल्या थेट कारवाईने, यात मोठे गौडबंगाल असल्याची पोलिसांत चर्चा आहे. औरंगाबाद पोलिसांनी आज येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने श्रीगोंदे व शेजारच्या दौंड येथे काही घरांची झडती घेतली; मात्र त्याचा तपशील मिळू शकला नाही.

औरंगाबादमधील फुलंब्री पोलिस ठाण्यात भारतीय स्फोटक कायद्यानुसार एक गुन्हा दाखल आहे. त्यात पकडलेल्या काही आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलिस येथे आले होते. त्यांनी शहरातील आढळगाव रस्त्यावरील एका गोदामावर छापा घातला. तेथे काही आक्षेपार्ह साहित्य आढळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असले, तरी औरंगाबाद पोलिसांकडून कोणतीच माहिती मिळाली नाही.

मराठवाड्यातील एका शहरात स्फोटकांचे एक गोदाम असून, त्याचे मालक श्रीगोंद्यातील काही व्यक्ती आहेत. तेथून काही स्फोटके बेकायदा श्रीगोंदेमार्गे औरंगाबादला जातात. त्यांची वाहतूक करणारी मालमोटार जप्त करून, त्याच्या चालकास ताब्यात घेऊन औरंगाबाद पोलिस गेले आहेत. काही लोकांना त्यांनी औरंगाबाद पोलिसात चौकशीसाठी बोलाविले असल्याने, अनेकांभोवती संशयाचे जाळे तयार झाले आहे.

पोलिस पथकाने जे साहित्य जप्त केले आहे, ते गावठी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे समजले; मात्र त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. सध्या याचा वापर कशासाठी होतो, हे स्पष्ट झाले नसले, तरी 2012पासून अमोनियम नायट्रेट वापरण्यासाठी परवानगीचे बंधन आहे. साठा सापडला त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समजले.

श्रीगोंदे शहरात अमोनियम नायट्रेट सापडले आहे. औरंगाबाद पोलिसांनी त्याच्या तपासाबाबत गुप्तता ठेवली आहे. त्यांनी आमच्याकडे मागणी केली, त्याप्रमाणे आम्ही कर्मचारी सोबत दिले होते. ते काही लोकांच्या शोधात होते. मात्र, त्याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही.
- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com