लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा: डॉ. सावंत

लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा: डॉ. सावंत
लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा: डॉ. सावंत

भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर जनतेला उद्देशून डॉ.सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, महानगर पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकुर, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल आदींसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

शुभेच्छा संदेशात डॉ.सावंत म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेल्या भारतीय संविधानामुळे प्रजासत्ताक दिनाला विशेष महत्त्व आहे. भारतीय संविधानामुळेच विविध शासकीय योजना आणि विकासकामांमध्ये राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आरोग्य विभागामार्फत गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असल्याबद्दल जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर मातांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. माता व बाल संगोपन कार्यक्रमातंर्गत बालक आणि मातांना संरक्षित करण्यात येत आहेत. जिल्ह्याने स्त्री जन्मदरातही आघाडी घेतली आहे. जिल्ह्यामध्ये 2011 मध्ये मुलींचा जन्मदर 1 हजार मागे 858 होता. परंतु पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी झाल्यामुळे जिल्ह्यात यावर्षी 1 हजार मुलांमागे 930 एवढे मुलींचे जन्मदराचे प्रमाण झाले आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानातंर्गत 60 गावांना मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवेअंतर्गत 3 लाख 40 हजार 602 शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या आणि अशा विविध प्रकारच्या आरोग्य सेवेसह विविध क्षेत्रातील योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे श्री.सावंत म्हणाले.

73 आणि 74 व्या घटनादुरूस्तीच्या माध्यमातून लोकशाहीची पाळेमुळे अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आजपासून 10 फेब्रुवारीपर्यंत 'लोकशाही पंधरवाडा' साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकशाही बळकटीकरण, सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक होण्यासाठी जास्तीत जास्त युवा, महिला वर्गांनी यात सहभागी होऊन लोकशाहीचे संवर्धन, संरक्षण व बळकटीकरण करुन सुशासनासाठी पुढाकार घ्यावा. प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी प्रयत्नशिल असावे, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

शासनाच्या महत्तवकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानामुळे अति‍रिक्त पाणीसाठा निर्माण होण्यास मदतच झाली आहे. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, लोकसहभागातून नद्यांचे पुनरुज्जीवन या योजनांमधून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्याला  वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ईको टास्क फोर्स बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटनाच्या विकासासाठी शासनामार्फत विविध विकासकामे हाती घेण्यात येऊन पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून गंगापूर आणि पैठण तालुक्यातील 23 शाळ डिजीटल झाल्या आहेत.

राज्यासह औरंगाबाद जिल्ह्याला समृध्द करणारा समृध्दी महामार्ग विकासात भर घालणाराच आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन शेतकऱ्यांच्या संमतीने करण्यात येऊन त्यांना पुरेसा मोबदला देऊन हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. याबरोबरच दिल्ली, मुंबई कॉरीडॉर सिटी यासाठी भूसंपादन सुरू आहे. ऑनलाईन  ई-फेरफार मध्येही जिल्ह्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषि सिंचन योजना यामध्येही पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस विभागाची कामगिरीही अभिमानास्पद आहे. हिंसक जमावाच्या नियंत्रणासाठी चिली ड्रोन, वाहतूक नियमनासाठी सर्वेलन्स ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे. औरंगाबाद पोलिस विभाग अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज झाला असून त्याचा वापरही प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील औरंगाबाद शहर सुरक्षित शहर होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. शासनामार्फत अशा प्रकारे विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहेत. यादृष्टीने जिल्ह्याची वाटचाल भूषणावह असल्याचे पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य असल्याचे सांगतांना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला अधिक जलद गतीने पुढे नेण्याचा मानस व्यक्त करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी परेडचे निरीक्षण करुन मानवंदना स्वीकारली. त्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार खान, यांना पुरस्कार, पदक, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या 23 पशुवैद्यकीय दवाखान्यांची आयएसओ नामांकनासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनाही गौरविण्यात आले तसेच भारत स्काऊट गाईड कार्यालयाच्यावतीने जय भवानी विद्यामंदीर, उद्धवराव पाटील विद्यालय, औरंगाबाद पब्लिक स्कुल आणि गोदावरी पब्लिक स्कुलच्या राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड यांना प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  पथसंचलनामध्ये पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड, सैनिकी शाळा, पोलिस बँन्ड पथक, श्वानपथक, सामाजिक वनीकरण, अग्निशमन दल, आरोग्य, सर्व शिक्षा अभियान आदी चित्ररथ व वाहन पथके सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com