रिक्षाचालकाची विष पिऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सांगली - येथील हनुमाननगरमधील रिक्षाचालक जावेद शमशेर तांबोळी (वय 36, तिसरी गल्ली) याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला.

सांगली - येथील हनुमाननगरमधील रिक्षाचालक जावेद शमशेर तांबोळी (वय 36, तिसरी गल्ली) याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एका पोलिस, मटकाबुकीसह सहा जणांनी त्रास दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. पोलिस तपास करीत आहेत. 
अधिक माहिती अशी, की रिक्षाचालक तांबोळी मूळचा करोली-टी (ता. कवठेमहांकाळ) येथील आहे. हनुमाननगर येथे पत्नी, तीन मुलींसह राहत होता. रविवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता तांबोळीने विष प्यायले. नातेवाइकांनी तत्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले. परंतु तो मृत झाल्याचे घोषित केले. नातेवाइकांनी शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला. दफनविधीसाठी मृतदेह करोली-टी येथे नेला. दफन करण्यापूर्वी कपडे तपासताना त्यात चिठ्ठी आढळली. त्यात तांबोळीने पोलिस, मटकाबुकीसह सहा जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी वाचून नातेवाइकांना धक्का बसला. त्यांनी दफनविधी थांबवून मृतदेह सिव्हिलमध्ये आणला. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून चिठ्ठी जप्त केली. त्यानंतर शवविच्छेदन झाले. "व्हिसेरा' राखून ठेवला आहे. 

चिठ्ठीत पाच जणांचा उल्लेख 
तांबोळीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस महेश सुतार तसेच प्रदीप सरगर, राजमहंमद नदाफ, गोसावी मावशी, बाळू खांडेकर, सोहेल पटेल यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सुतारकडून 2 लाख, सरगरकडून 90 हजार, नदाफकडून 25 हजार, खांडेकरकडून 50 हजार, गोसावी मावशीकडून 14 हजार येणे आहे. सोहेल पटेलची मटका बुकी आहे. त्याने चार पाचवेळा रिक्षा ओढून नेली. कागदपत्रे जवळ ठेवली होती. पैसे देणे बाकी असलेल्या व्यक्ती पैसे देत नव्हत्या. बचतगटाचे हप्ते केवळ रिक्षा व्यवसायावर भरता येत नाहीत म्हणून आत्महत्या करीत आहे. त्याला सहा जण कारणीभूत आहेत, असेही म्हटले आहे. 

गुन्हा दाखल होणार
तांबोळी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरावरून सहा जणांविरुद्ध लवकरच विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: auto rickshwa driver suicide by drinking poison