पत्नीचा खून करणारा रिक्षाचालक मृतावस्थेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सातारा - डोक्‍यात पहार मारून पत्नीचा खून केलेल्या पतीचा मृतदेह आज सायंकाळी चार भिंती परिसरात आढळून आला. त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

सातारा - डोक्‍यात पहार मारून पत्नीचा खून केलेल्या पतीचा मृतदेह आज सायंकाळी चार भिंती परिसरात आढळून आला. त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

धनंजय दगडू खोत (वय 50, रा. माची पेठ) असे त्याचे नाव आहे. धनंजय हा पत्नी व दोन मुलांसह माची पेठेत राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. रिक्षा चालवूनही तो घरात पैसे देत नव्हता. त्यावरून पत्नी वैशालीशी त्याचा सतत वाद व्हायचा. सोमवारी (ता. 15) रात्री त्यांच्या मुलीने वैशाली यांच्याकडे पुस्तकांसाठी पैसे मागितले. या वेळी दीडशे रुपये वडिलांकडून घे, असे त्या म्हणाल्या. यावरून त्यांचा पतीशी वाद झाला होता. मंगळवारी सकाळी मुले शाळेत गेल्यावर धनंजयने लोखंडी पहार डोक्‍यात मारून वैशाली यांचा खून केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. तो अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे शोध घेतला. या वेळी त्याची रिक्षा चारभिंती परिसरात आढळून आली; परंतु तो पोलिसांना सापडला नव्हता. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, चार भिंती परिसरात एक मृतदेह असल्याची माहिती आज सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी गेले. पाहणी केल्यावर तो मृतदेह धनंजयचा असल्याचे समोर आले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 

Web Title: autorickshaw driver dead wife's murder case

टॅग्स