अवताडे-शिंदेंचा फोटो व्हायरल झाल्याने मंगळवेढ्यात खळबळ

हुकूम मुलाणी
शनिवार, 12 जानेवारी 2019

मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या सहकार राजकारणातील सर्वेसर्वा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या सहकार राजकारणातील सर्वेसर्वा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व असणारे बबनराव आवताडे तालुक्यातील एक मोठे राजकीय वजनदार व्यक्तिमत्त्व असून, त्यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणारी असते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो यावर तालुक्याची राजकीय गणिते बांधली जात आहेत. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व बबनराव आवताडे यांचे काही वेळेला राजकीय मतभेद जरी असले तरी ढोबळे यांनी आवताडे यांच्या एका कार्यक्रमात बोलताना मला सरळ न होणारी माणसे बबनराव काही क्षणात सरळ करतात, अशी गुगली टाकून अवताडे यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी असताना सुशीलकुमार शिंदे यांचे तालुक्यातील वाढते दौरे हे त्यांच्या राजकीय हालचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मंगळवेढ्यातील काँग्रेस आ. भारत भालके व शिवाजीराव काळुंगे या दोन गटात विभागली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षात शिंदेंची भूमिका महत्वाची आहे. अशा परिस्थितीत सुशीलकुमार शिंदे व बबनराव आवताडे यांच्या भेटीची चर्चा मात्र तालुक्यांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात होणारी राजकीय खळबळ मात्र तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यांचे पुतणे गत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. आता ते पुन्हा विधानसभेचे दावेदार आहेत. पण सध्याची राजकीय हालचाल पाहता ती शिवसेनेपासून काही अंतरावर असल्याचे दिसत आहे.

सहकारी क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व असल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे यांना त्यांचे चुलते बबनराव आवताडे यांनी पाठिंबा दिल्याने त्यांनी 40 हजारांहून अधिक मंगळवेढा तालुक्यात मते घेतली. मात्र, यावेळी बबनराव आवताडे यांची भूमिका अद्यापी गुलदस्त्यातच असल्याने राजकीय निरीक्षक त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Avatade and Sushilkumar Shindes photo Viral excitement in the Magalvedha taluka