कोरोनाचे संकट टळू दे; बेघरांचे बाप्पांकडे मागणे; सावली केंद्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

सांगलीसह महापालिका क्षेत्रात फिरणाऱ्या बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी इन्साफ फौंडेशन गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे.

सांगली ः कोरोनाचे संकट टळू दे. पुन्हा पहिल्यासारखे होवू दे, असे मागणे गणरायाकडे करण्यात आले. येथील सावली बेघर निवारा केंद्रात बाप्पांचे जल्लोषी स्वागत करत पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. केंद्रात सारे नुकतेच कोरोनामुक्त झाले असून इतरांवरीलही संकट दूर व्हावी, अशी अपेक्षा त्या बेघरांनी व्यक्त केली आहे. 

सांगलीसह महापालिका क्षेत्रात फिरणाऱ्या बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी इन्साफ फौंडेशन गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय नागरीक उपजिवीका अभियानांतर्गत महापालिका आणि इन्साफ फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपासून निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

फौंडेशनचे संस्थापक मुस्तफा मुजावर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र चालविले जाते. याठिकाणी आतापर्यंत शहरातील सर्व बेघरांना हक्काचा निवारा देण्यात आला आहे. काहींच्या कुटुंबियांचा शोध घेवून त्यांना परत पाठविण्यात आले. सद्यस्थितीत याठिकाणी 56 जण राहतात. अनेकजण व्याधीत्रस्त आहेत. त्याच्यावर त्याचठिकाणी उपचार केले जातात. 

10 जुलै रोजी इथल्या निवारा केंद्रावर एकास कोरोनाची बाधा झाली. दोन दिवसात तेथील 63 जणांना बाधा झाली. प्रशासनाचे धाबे दणाणले आणि सांगलीकरांची नजर या केंद्रकडे लागली. प्रशासनाने तातडीने खबरदारी आणि उपाययोजना केल्या. फार हाय-फाय उपचार न घेता. केवळ अन्‌ केवळ उत्तम आहार, वेळेवर औषधे आणि बिनधास्तपणा या जोरावर जागतिक रोगावर सहज मात केली. एकही जिवीतहानी न होता हे केंद्र कोरोनामुक्त झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही जल्लोषात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक मूर्ती प्रतिष्ठापन करून टाळच्या निनादात स्वागत करण्यात आले. नित्याने याठिकाणी गणरायाला प्रसाद दाखवला जात असून पूजा-अर्चा या बेघरांकडून केली जाते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid the Corona crisis; Begging the homeless to Bappa; Eco friendly Ganeshotsav at Savli Kendra