"त्या'वरच "आयुष'ची उभारणी 

विठ्ठल लांडगे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सात निवासस्थाने असून, उर्वरित जागा मोकळी आहे. या मोकळ्या जागेत "आयुष'ची प्रशस्त इमारत उभी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे शासनस्तरावरून ई-निविदा काढण्यात आली. 

नगर : "राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन'अंतर्गत शहरात "आयुष' हॉस्पिटल होणार आहे. या हॉस्पिटलच्या कामाच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच एका शाळेने "मैदान वाचवा' आंदोलन केल्याने कामास खीळ बसली. त्यानंतर पहिला आराखडा बदलून दुसरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसरा आराखडा हॉस्पिटलच्या दृष्टीने अयोग्य आहे. पूर्वीचाच आराखडा योग्य असल्याने त्यानुसार "आयुष'ची उभारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

आयुष हॉस्पिटल शहरातील तारकपूर परिसरातील जिल्हा रुग्णालयाच्या 34 हजार 557 चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या जागेवर फक्त जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सात निवासस्थाने असून, उर्वरित जागा मोकळी आहे. या मोकळ्या जागेत "आयुष'ची प्रशस्त इमारत उभी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे शासनस्तरावरून ई-निविदा काढण्यात आली. 

निविदा प्रक्रिया
सात कोटी 31 लाख 63 हजार 625 रुपयांच्या निविदेला मंजुरी देऊन त्यातील सुमारे एक कोटीचा निधीही वर्ग करण्यात आला. 36 हजार 608 चौरस फुटांची, 30 बेडची सुसज्ज, दक्षिणोत्तर इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार कामास सुरवात होणार होती. 

"आयुष'साठी संघटनांचा लढा 
उद्‌घाटनाच्या दिवशीच "त्या' शाळेने "मैदान वाचवा' आंदोलन केल्यानंतर हे काम स्थगित केले. त्यानंतर पुन्हा आराखडा बनविण्यात आला होता. दुसरा आराखडा पूर्व-पश्‍चिम असा करण्यात आला होता. "त्या' शाळेच्या हट्टापायी प्रशासनाने पहिला आराखडा बदलून दुसरा आराखडा तयार केला. या प्रश्‍नावर भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे व ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी यांनी आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. त्याबरोबरच अखिल भारतीय क्रांतिसेनेचे प्रदेशाध्यक्ष मधुकर म्हसे यांनी या बदलावर आवाज उठवून शाळेसाठी जागा दिली, तर आम्हालाही तेथे कार्यालयासाठी जागा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. 

विरोधानंतर सखोल चौकशी 
सामाजिक संघटनांनी आयुष हॉस्पिटलच्या बदलत्या आराखड्याला विरोध केल्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली. तसेच दोन्ही आराखड्यांवर वास्तुविशारदांची मतेही जाणून घेण्यात आली. यामध्ये वास्तुविशारदांनी पूर्वीचा दक्षिणोत्तर आराखडा हॉस्पिटलसाठी योग्य आहे. त्याप्रमाणे हॉस्पिटल झाले, तर त्यामध्ये सूर्यप्रकाश चांगला राहून हवाही खेळती राहणार आहे. तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉस्पिटलचा विस्तार करायचा असेल, तर उर्वरित जागा त्यासाठी उपयोगात आणता येईल, असे अहवालात म्हटले आहे. 

दुसरा आराखडा नुकसानीचा 
दुसऱ्या आराखड्यानुसार इमारतीची उभारणी केली, तर त्यामध्ये सूर्यप्रकाश व हवा कमी प्रमाणात खेळती राहील. तसेच भविष्यात हॉस्पिटलचा विस्तार करायचा म्हटले, तर शक्‍य होणार नाही. दुसरा आराखडा शासकीय जागेचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे पूर्वीच्याच दक्षिणोत्तर आराखड्यानुसारच "आयुष'चे काम व्हावे, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला आहे. 

दोन निवासस्थाने वाचली 
आयुष हॉस्पिटलचा आराखडा बदलला असता, तर त्यामध्ये सुसज्ज स्थितीत असलेली दोन निवासस्थाने पाडावी लागली असती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला मोठे नुकसान झाले असते. परंतु आता पूर्वीप्रमाणेच "आयुष'चे काम होणार आहे. त्यामुळे ही निवासस्थाने जैसे थे राहणार आहेत. 

संरक्षक भिंतीने काम होणार सुरू 
"आयुष'च्या इमारतीच्या कामाची सुरवात संरक्षक भिंतीने होणार आहे. त्यानंतर हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. संरक्षक भिंतीच्या कामास येत्या दोन ते तीन दिवसांत सुरवात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

भविष्याच्या दृष्टीने योग्य ः द्विवेदी 
आयुष हॉस्पिटलसंदर्भात वास्तुविशारदांनी केलेला पूर्वीचा दक्षिणोत्तर आराखडा भविष्याच्या दृष्टीने विचार करता योग्य आहे. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

प्रशासनाचा निर्णय कौतुकास्पद ः भद्रे 
"त्या' शाळेच्या अट्टहासासाठी शासनाची कोट्यवधी रुपयांची जागा वाया घालणे अयोग्य होते. त्यामुळेच आम्ही त्या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच आराखड्यानुसार काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधींच्या जागेचे योग्य नियोजन करून रुग्णांसाठी तेथे भविष्यात मोठे रुग्णालयही होऊ शकते. प्रशासनाचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. 
- सुधीर भद्रे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनसंसद 

प्रशासनाकडून चांगला निर्णय ः म्हसे 
जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयुष हॉस्पिटल होणे महत्त्वाचे आहे. या हॉस्पिटलची उभारणी व्हावी, यासाठीच आम्ही "त्या' शाळेला खेळण्यासाठी जागा सोडून हॉस्पिटलचा आराखडा बदलला, तर आम्हालाही तेथे जागा द्यावी, अशी मागणी केली. परंतु आता प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच आराखडा ठेवल्यामुळे त्यांचे अभिनंदन. 
- मधुकर म्हसे, प्रदेश संपर्कप्रमुख, क्रांतिसेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Of Ayush Installation as per previous plan