बाबासाहेब पुरंदरे श्री विठ्ठलाच्या दर्शना विना परतले...

अभय जोशी
मंगळवार, 9 मे 2017

पंढरपूरः महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आज (मंगळवार) आले होते. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश करत असताना तेथील पोलिसांनी त्यांना तेथून मंदिरात जाण्यास मनाई केली. त्यामुळे काही वेळ तिथेच थांबून श्री. पुरंदरे हे श्री विठ्ठलाचे दर्शन न घेताच पुण्याकडे रवाना झाले. ही घटना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. श्री.पुरंदरे यांच्या संदर्भात घडलेल्या या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवून निषेध केला.

या घटनेची समजलेली माहिती अशी की, आज एका विवाह समारंभासाठी श्री. पुरंदरे करमाळा तालुक्‍यातील कंदर येथे आले होते. तेथून पुण्याचे माजी महापौर माऊली शिरवळकर व स्वीय सहायक सुनील शिरगावकर यांच्यासह श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी ते पंढरपूर येथे आले होते. चौफाळ्याकडून मंदिराकडे जाताना प्रथम पश्‍चिम दरवाजा लागतो. त्या दरवाजातून भाविक बाहेर येतात. परंतु तेथून आत गेलो तर श्री. पुरंदरे यांना जास्त चालावे लागणार नाही, या भावनेने श्री. शिरगावकर यांनी श्री. पुरंदरे यांना त्या दरवाजातून आत सोडण्याची परवानगी तेथील पोलिसांकडे मागितली. तेंव्हा त्यानी तेथून कोणाला सोडता येणार नाही, असे सांगून व्हीआयपी गेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्री रुक्‍मिणी गोपुराच्या दरवाजातून आत जाण्याची सूचना केली.

दरम्यान, श्री. पुरंदरे आल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकांची तिथे गर्दी वाढली. अनेक लोक त्याच्या पाया पडू लागले. गर्दी अधिकच वाढू लागली. शेवटी गुडघेदुखीमुळे व उन्हामुळे हैराण झालेल्या श्री. पुरंदरे यांनी व्हीआयपी गेट कडे जाण्याऐवजी पंधरा दिवसानंतर पुन्हा येणार आहोत, त्यावेळी दर्शन घेऊ असे श्री. शिरगावकर यांना सांगून पुन्हा पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेऊन ते दर्शन न घेता पुण्याकडे रवाना झाले.

या संदर्भात श्री.पुरंदरे यांचे स्वीय सहायक सुनील शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता "सकाळ" शी बोलताना ते म्हणाले, श्री. पुरंदरे यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. आपण माजी महापौर श्री. शिरवळकर यांच्यासह श्री. पुरंदरे यांना घेऊन दर्शनासाठी गेलो होतो. परंतु, तेथील पोलिसांनी पश्‍चिम दरवाजातून प्रवेश देण्यास मनाई केली. त्यामुळे दुसऱ्या दरवाजाकडून फिरुन आत जाण्याऐवजी पंधरा दिवसानी आपण परत येणार आहोत त्यावेळी शांतपणे दर्शन घेऊ असे श्री.पुरंदरे यांनी आपल्याला सांगितले. व त्यानुसार दर्शन न घेता आम्ही पुण्याकडे निघालो आहोत. घडलेल्या प्रकारा संदर्भात श्री. पुरंदरे यांची कोणाच्याही विषयी कोणतीही तक्रार नाही. पंढरपूर येथील मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला आहे. दुकाने बंद करुन विनाकारण राईचा पर्वत करु नका, अशी विनंती श्री. पुरंदरे यांनी पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना केली आहे.

या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, श्री. पुरंदरे येणार असल्याची आम्हाला ऐनवेळी माहिती मिळाली. तथापी आम्ही त्यांना व्हीआयपी गेट कडून प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्याची तयारी ठेवली होती. परंतु ते पश्‍चिम दरवाज्याकडूनच परत गेले.

Web Title: babasaheb purandare returning pandharpur