वडिलांसमोर मुलाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

तोल जाऊन विहिरीत पडलेल्या शालेय मुलाचा वडिलांसमोर मृत्यू झाला

संगमनेर (नगर) ः तोल जाऊन विहिरीत पडलेल्या शालेय मुलाचा वडिलांसमोर मृत्यू झाला. राजापूर येथे शनिवारी (ता. 9) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार झाला. ऋषिकेश सुनील सोनवणे (वय 12, रा. राजापूर) असे त्याचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी : राजापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात सहावीत शिकणारा ऋषिकेश काल (शनिवारी) दुपारी वडील सुनील सोनवणे यांच्यासोबत ट्रॅक्‍टरवरून शेतात जात होता. त्यांच्या शेतातील बिनकठड्याची विहीर यंदा तुडुंब भरली आहे. तेथील वीजपंपाचा पाइप ट्रॅक्‍टरच्या मार्गात येत असल्याने ऋषिकेशने खाली उतरून तो बाजूला केला. त्यानंतर वडिलांनी ट्रॅक्‍टर पुढे नेला. त्याच वेळी तोल जाऊन तो विहिरीत पडला. 

हे दृश्‍य पाहून त्याच्या वडिलांनी आरडाओरडा करीत मदतीसाठी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, त्यांच्या डोळ्यासमोर तीन गटांगळ्या खाऊन, ऋषिकेश पाण्यात बुडाला. सायंकाळी सात वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा व उत्तरीय तपासणीनंतर त्याच्यावर रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन बहिणींच्या पाठीवर तो सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा होता. 

विहिरीत पडून मुलाचा मृत्यू 

पाथर्डी : पिण्यासाठी पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या 15 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. फुंदे टाकळी येथे शनिवारी (ता. 9) दुपारी ही घटना घडली. वैभव भागवत फुंदे (वय 15) असे मृताचे नाव आहे. रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 
शेतातील कापूस वेचणीसाठी वैभव फुंदे शनिवारी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास पाणी आणण्यासाठी तो विहिरीवर गेला. पाणी शेंदताना तोल जाऊन तो विहिरीत पडला. हा प्रकार लक्षात येताच, तरुणांनी विहिरीत उड्या घेऊन वैभवचा शोध घेतला. परंतु विहिरीला पाणी जास्त असल्याने तो सापडला नाही. ग्रामस्थांनी तातडीने चार वीजपंप विहिरीत सोडून पाणी उपसण्यास सुरवात केली. मात्र, विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यात बराच वेळ गेला. 

प्रशासनाला तत्काळ माहिती देऊनही उशिरापर्यंत कुठलीही यंत्रणा घटनास्थळी आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर काल रात्री दहा वाजता वैभवचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. भुतेटाकळी येथे रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या त्या दिवशी कामावर असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby dies in front of father