सदाभाऊ! तुमचे अश्रू आटले का? - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

सांगली-विटा - सदाभाऊ खोत बोलायचे तेव्हा सभेच्या डोळ्यांत पाणी यायचे आता मात्र त्यांच्या डोळ्यांतील शेतकऱ्यांप्रतीचे अश्रू पार आटले आहेत. ते मंत्री झाले चांगलेच झाले; मात्र आता त्यांनी आता लाल दिव्यासह आमच्या आसूड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. निवडणुकी वेळी भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेतर्फे आसूड यात्रा सुरू करण्यात आली आहे. आज (ता. १५) ही यात्रा जिल्ह्यात आली. विटा, तासगाव, सांगली आणि मिरज येथे ही यात्रेचे जोरदार स्वागत झाले.

सांगली-विटा - सदाभाऊ खोत बोलायचे तेव्हा सभेच्या डोळ्यांत पाणी यायचे आता मात्र त्यांच्या डोळ्यांतील शेतकऱ्यांप्रतीचे अश्रू पार आटले आहेत. ते मंत्री झाले चांगलेच झाले; मात्र आता त्यांनी आता लाल दिव्यासह आमच्या आसूड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. निवडणुकी वेळी भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेतर्फे आसूड यात्रा सुरू करण्यात आली आहे. आज (ता. १५) ही यात्रा जिल्ह्यात आली. विटा, तासगाव, सांगली आणि मिरज येथे ही यात्रेचे जोरदार स्वागत झाले.  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील या वेळी उपस्थित होते.

आमदार कडू म्हणाले,‘‘शेतकऱ्यांच्या  आत्महत्या होत असताना सरकारला त्याची लाज कशी वाटत नाही? आमदार- कर्मचाऱ्यांचे पगार थांबले का? हे  सरकार पाकीटमार आहे. तुरडाळ दर घटवून या सरकारने क्विंटलमागे आठ हजारांची पाकिटमारी केली आहे. रामदेवबाबाचे अडीचशे देशांत प्रॉडक्‍ट जातात. त्यांना निर्यात बंदी नाही, मग शेतमालाला निर्यातबंदी का? ’’

ते म्हणाले,‘‘ मुख्यमंत्री शाश्‍वत शेती करा असे सांगतात त्यांनी शेती शाश्‍वत होण्यासाठी काय केले? वीज,पाणी,दर,पाऊस यातले काय शाश्‍वत आहे. आसूड यात्रा मोदी-फडणवीस विरोधातील नाही तर शेतकऱ्यांना जागे करण्यासाठीची आहे. येत्या २१ एप्रिलपर्यंतची सरकारला मुदत आहे.

त्यादिवशी मोदींच्या  गुजरातमधील वडनगरला १ हजार शेतकरी रक्तदान करतील.आम्ही मोदीसाहेबांना सांगू की आमचे लागेल तेवढे रक्त घ्या, हवे तर दोन्ही हातांतून, पायांतून घ्या पण जीव घ्यायचे धोरण थांबवा.’’

रवी शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी कालिदास आपटे, दत्तकुमार खंडागळे यांची भाषणे झाली. सभेस माजी उपनगराध्यक्ष ॲड. सचिन जाधव, ॲड. तानाजी जाधव, बी. आर. पाटील, शेतकरी संघटनेचे अशोक माने, हणमंत पाटील, ॲड. प्रमोद भोसले, महेश जगदाळे उपस्थित होते.  धीरज भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले. सत्यवान माने यांनी आभार मानले.

‘जिल्हा सुधार’चा रक्तदानाने पाठिंबा
सांगलीत जिल्हा सुधार समितीच्यावतीने आसूड यात्रेला पाठिंबा म्हणून रक्तदान शिबिर झाले. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. के.डी.शिंदे ॲड.अमित शिंदे, आर.बी.शिंदे, जयंत जाधव उपस्थित होते. आसूड यात्रा म्हणजे ऐतखाऊंच्याविरोधातील कष्टकऱ्यांच्या लढ्याची सुरवात आहे. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टीच आहे मात्र हा लढा आम्ही शेतमालाच्या हमीभावापर्यंत नेणार असून तो शेतकऱ्यांनी जात, पंथ,धर्मापलीकडचा विचार केल्याशिवाय यशस्वी होणार नाही असेही ते म्हणाले.

Web Title: bacchu kadu talking to sadabhau khot