'दानवेंना चोपणार, फडणवीस सरकारने जलयुक्त व तुरीत लुटले"

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दानवेंना चोपणार 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काढलेल्या वक्तव्यावर बोलताना कडू म्हणाले, त्यानंतर ते आम्हाला भेटले नाहीत. जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा त्यांना आम्ही चोपून काढू. यापुढे आम्ही काहीही सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जलयुक्तचा गवगवा करत आहेत. त्या जलयुक्तमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असा कैवार घेणाऱ्या सरकारने तुरीच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यामुळे कृतीपेक्षा फक्त भपकेबाजपणावर भर असल्यामुळे फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

आमदार कडू यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यानिमित्त ते आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात 13 हजार रुपये क्विंटलने यापूर्वी शेतकऱ्यांची तूर विकली जात होती. आज त्याचा भाव तीन-चार हजारावर आला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना हमीभावाने तूर खरेदी केल्याचा कांगावा सरकार करत आहे. 13 हजारावरुन केवळ पाच हजार रुपये प्रतिक्विंटल शेतकऱ्यांना देऊन हे सरकार त्यांची लूट करत असल्याचा आरोप श्री. कडू यांनी केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधताना ते म्हणाले, यापूर्वी 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या या दोन्ही पक्षानी स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषीमंत्री असतानाही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी संघर्ष यात्रा काढली. खरेतर या दोन्ही पक्षाच्याविरोधात संघर्ष करण्याची गरज आहे. गेल्या 70 वर्षापासून सत्तेच्या बाजूने असूनही शेतकरी, कामगार हा वर्ग अद्यापही उपाशीच राहिला आहे. जीएसटीमुळे आर्थिक सुबत्ता येईल, पण त्या पैशाचे योग्य ते नियोजन करणे गरजेचे असल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले. 

कांबळे यांची गाडी काळी करणार 
सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अपंगांना 600 वरुन एक हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन आम्हाला दिले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून आम्ही श्री. कांबळे यांची गाडी काळी करणार असल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांची लुबाडणूक 
शिक्षण शुल्क कायदा असूनही मुंबईमध्ये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी वसुल केली जाते. ज्याठिकाणी शिक्षणमंत्री असताता, मंत्रालय आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची लुबाडणूक होत असेल तर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री काय करतात. त्यामुळे यापुढे आरोग्य व शिक्षण या विषयावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: bachchu kadu blames fadnavis for corruption in jalyukt, loot of farmers