मागासवर्गीयांचे अनुदान लाटणाऱ्यांची चौकशी लावणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

कामेरी - मागासवर्गीयांच्या नावाखाली अनुदान लाटणाऱ्या राजारामबापू सूतगिरणीसह इतर सर्व संस्थांची चौकशी लावू, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

शिवगणेश मंदिराच्या सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार राजू शेट्टी अध्यक्षस्थानी होते. राजारामबापू यांच्या निधनानंतर वाळव्यातील साहेबांनी स्वार्थी राजकारण केले, असा टोला जयंत पाटील यांचे नाव न घेता खोत यांनी लगावला.

कामेरी - मागासवर्गीयांच्या नावाखाली अनुदान लाटणाऱ्या राजारामबापू सूतगिरणीसह इतर सर्व संस्थांची चौकशी लावू, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

शिवगणेश मंदिराच्या सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार राजू शेट्टी अध्यक्षस्थानी होते. राजारामबापू यांच्या निधनानंतर वाळव्यातील साहेबांनी स्वार्थी राजकारण केले, असा टोला जयंत पाटील यांचे नाव न घेता खोत यांनी लगावला.

ते म्हणाले,""मागासवर्गीयांच्या नावाखाली राजारामबापू सूतगिरणी व अनेक संस्थांनी अनुदान लाटले. या बरोबरच कोकण, यवतमाळ आदी ठिकाणी तालुक्‍यातील काही नेत्यांनी सहकारी तत्त्वावर प्रकल्प काढून अनुदान लाटले. अशा संस्थांची जंत्री काढून चौकशी लावू. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विकास आघाडीबरोबर आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह समविचारींना सोबत घेऊन लढत देऊ. वाळवा पंचायत समितीवर विकास आघाडीचाच झेंडा फडकावू.''

ते म्हणाले,""मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधी रुपये विकासकामासाठी आणलेत. एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही. कामांच्या दर्जाबाबतही तडजोड केली जाणार नाही.''

श्री. शेट्टी म्हणाले,""काही नेत्यांमुळे तालुक्‍याचा इतिहास काळवंडला आहे. येत्या निवडणुकीत प्रस्थापितांची मक्तेदारी मोडू.''

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले,""जनतेने आमदार केले आणि त्यांनी 30 वर्षांत लोकांना फसवले. गट-तट निर्माण केले. ते गोड बोलून फसवतात. त्यांना धडा शिकवण्यास तरुण पिढीने परिवर्तन घडवले.''

नानासाहेब महाडिक म्हणाले,""इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडी केली. त्याच पद्धतीने सर्वांनी एकत्रित येऊन अशी आघाडी पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी करावी.''

कॉंग्रेसचे नेते सी. बी. पाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख दि. बा. पाटील, आरपीआयचे अरुण कांबळे उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी स्वागत केले. युवा नेते जयराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी उपसरपंच दिलीप जाधव यांनी आभार मानले.

सभागृह उद्‌घाटनाच्या निमित्ताने विकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार होती. मात्र भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

नाईक यांची अनुपस्थिती

आमदार शिवाजीराव नाईक व कॉंग्रेसचे नेते सी. बी. पाटील बऱ्याच कालावधीनंतर एका व्यासपीठावर येणार होते. मात्र श्री. नाईक यांनी पाठ फिरवली. त्यांनी शिराळ्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवू, अशी घोषणा केली आहे. सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्‍यात विकास आघाडीच्या माध्यमातून लढवू हा शब्द आहे, असे म्हटले आहे. काल कामेरीत कार्यक्रम झाला. शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद गट येतात. विकास आघाडी स्थापनेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली.

Web Title: Backward class grants