सोलापूर : महापालिकेला प्रतीक्षा चार-चौघांच्या बळींची

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 4 मे 2018

सोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही. 

सोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही. 

तुळजापूर रस्त्यावर असलेल्या या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पूर्वी या परिसराचे स्वरूप जंगलासारखेच होते. उघड्यावर अंत्यविधी उरकला जाई. पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत असे. प्रेत जाळल्यानंतर पाऊस झाला तर संबंधितांच्या नातेवाइकांना त्याच ठिकाणी थांबावे लागे. पाऊस थांबल्यावर पुन्हा चिता पेटवली जात होती. पाऊस आल्यावर थांबायला आडोसाही नव्हता. तशाच स्थितीत क्रियाकर्म उरकले जात. आता अंत्ययात्रेला आलेल्या नागरिकांसाठी आडोसा आहे, पण देवाघरी गेलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार तरी व्यवस्थित होतील का, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. या ठिकाणी असलेले शेड अत्यंत धोकादायक झाले आहे. ते कधी कोसळेल, याचा नेम नाही. स्मार्ट सिटीचा सातत्याने जप करणाऱ्या महापालिका प्रशासनाला दोन-चारजणांचे बळी गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मक्तेदार मिळत नाही, असे बालिश उत्तर प्रशासनाकडून दिले जाते. 

तत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मातोश्रींचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाले. अंत्यविधीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्या सर्वांना येथील असुविधेचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्या वेळी श्री. शिंदे यांनी या स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी निधी दिला. त्यानंतर या ठिकाणी प्रेत जाळण्यासाठी शेडची उभारणी, बसण्यासाठी कट्टा, परिसरामध्ये बगीचा, स्वच्छतागृह बांधले गेले. त्यामुळे या परिसराला स्मशानभूमीऐवजी एखाद्या उद्यानासारखे स्वरूप आले. अशा या स्मशानभूमीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. "विसावा' घेण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे रस्त्याला टेकले आहे. बसण्यासाठी व्हरांडा बांधण्यात आला आहे, मात्र त्याच्या फरशा निघाल्या आहेत. धुराड्यांची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात चिता विझण्याची शक्‍यता असते. 

मोबाईल टॉर्चचा करावा लागतो वापर 
रात्रीच्या वेळी दिवाबत्तीचीही सुविधा नाही. त्यामुळे गॅसबत्तीची आणि कधी-कधी मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. परिसरात गवत वाढले आहे. शेडच्या भिंतींना तडे गेले आहेत. अशाच स्थितीत या ठिकाणी अंतिम क्रियाकर्म करावे लागतात. 

Web Title: bad condition of graveyard in solapur no concentration of municipal corporation