न्याय देणारेच समस्यांच्या विळख्यात! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सोलापूर : अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि उडणारी धूळ.. नियोजनाअभावी जागा मिळेल तिथे लावलेली वाहने.. स्वच्छतागृहांमधून दूरपर्यंत पसरलेली दुर्गंधी.. इमारतीच्या मागे उघड्यावरची मुतारी.. जागोजागी साचलेला कचरा.. जागा मिळेल तिथे बसलेले लोक.. हे चित्र आहे सोलापूर जिल्हा न्यायालयातील. लोकांना न्याय मिळावा यासाठी झटणाऱ्या वकील आणि न्यायाधीश मंडळींनाच समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या परिसरात काम करावे लागत आहे. 

सोलापूर : अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि उडणारी धूळ.. नियोजनाअभावी जागा मिळेल तिथे लावलेली वाहने.. स्वच्छतागृहांमधून दूरपर्यंत पसरलेली दुर्गंधी.. इमारतीच्या मागे उघड्यावरची मुतारी.. जागोजागी साचलेला कचरा.. जागा मिळेल तिथे बसलेले लोक.. हे चित्र आहे सोलापूर जिल्हा न्यायालयातील. लोकांना न्याय मिळावा यासाठी झटणाऱ्या वकील आणि न्यायाधीश मंडळींनाच समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या परिसरात काम करावे लागत आहे. 

अनेकदा पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. चालताही येत नाही एवढी वाहने न्यायालय आवारात दिसत आहेत. नियोजनाअभावी जागा मिळेल तेथे वाहने लावत आहेत. जिल्हा न्यायालयातील विविध समस्यांबाबत सोलापूर बार असोसिएशने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. अशी अनेक निवेदने यापूर्वीही देण्यात आली आहेत. निधी उपलब्ध नसल्याचे सांगून अनेक कामे प्रलंबित आहेत.

या आहेत मागण्या :
- अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. 
- पाण्याची टाकी धुवून स्वच्छ करावी. 
- स्वच्छतागृहाची डागडुजी करावी. 
- नळाच्या तोट्या बदलून नवीन बसवाव्यात. 
- धुळीमुळे त्रास होत आहे, फरशीकरण करण्यात यावे. 

आकडे बोलतात.. 
न्यायालयातील वकिलांची संख्या : तीन हजार 
कामासाठी येणाऱ्या वकिलांची संख्या : 1200 
रोज येणारे पक्षकार, साक्षीदार : तीन हजार 
अंदाजे वाहनांची संख्या : एक हजार 

सर्वसाधारण बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. समस्यांबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. अंतर्गत रस्ता खूपच खराब झाला आहे. 
- हिराचंद अंकलगी, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन 

न्यायालय, बार असोसिएशन कार्यालय परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते खराब झाल्याने धुळीचे साम्राज्य आहे. समस्यांबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे. आता आणखी एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मरणपत्र देण्यात येईल. त्यानंतर बैठकीत पुढील दिशा ठरवू. 
- आसिफ शेख, सचिव, सोलापूर बार असोसिएशन 

जिल्हा न्यायालयात महिला वकिलांनीही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. न्यायालयाने महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष दिला आहे, पण तिथे कोणत्याही सुविधा नाहीत. पार्किंगचा प्रश्‍न खूपच त्रासदायक आहे. रस्ता खराब असल्याने वाहन चालविणे अवघड आहे. 
- ऍड. शर्मिला देशमुख 

न्यायाधीश, वकिलांसह परगावाहून येणारे साक्षीदार, पक्षकारांना समस्यांचा त्रास होत आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, पक्षकारांना बसण्यासाठी व्यवस्था नाही, जागोजागी कचरा साचलेला आहे. उघड्यावरच्या मुतारीमुळे दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतागृहे स्वच्छ केली जात नाहीत. 
- ऍड. डी. एन. भडंगे

Web Title: bad condition of solapur district court