मराठा-ओबीसींमध्ये भांडणाचे "फडणवीसी' कारस्थान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

सांगली - आधी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून ते ओबीसींनाही बहुजनांमधून वेगळे करण्याचे त्यांचे कारस्थान आहे, असा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे मुख्य प्रवर्तक वामन मेश्राम यांनी आज येथे केला. राज्यातला दहावा बहुजन क्रांती मोर्चाची आज येथील कर्मवीर चौकात सांगता झाली. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेच्या सांगताप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेत हजरत मौलाना सज्जाद नोमाणी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मोर्चात मुस्लिम समाजाचा उल्लेखनीय सहभाग होता.

सांगली - आधी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून ते ओबीसींनाही बहुजनांमधून वेगळे करण्याचे त्यांचे कारस्थान आहे, असा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे मुख्य प्रवर्तक वामन मेश्राम यांनी आज येथे केला. राज्यातला दहावा बहुजन क्रांती मोर्चाची आज येथील कर्मवीर चौकात सांगता झाली. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेच्या सांगताप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेत हजरत मौलाना सज्जाद नोमाणी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मोर्चात मुस्लिम समाजाचा उल्लेखनीय सहभाग होता. अठरा पगड जातीच्या सुमारे पन्नासांवर संघटनांनी या मोर्चासाठी आवाहन केले होते. 

श्री. मेश्राम म्हणाले, ""मराठा क्रांती मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून दलितांचे मोर्चे काढावेत, असा प्रस्ताव संघ परिवारातून आमच्यासमोर आला होता. माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या या माहितीची मी स्वतः पुण्यात येऊन खात्री केली. दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत, असे आवाहन काही बहुजन नेत्यांनी केले. मात्र आम्ही मोर्चे काढूच ते मराठा समाजाविरोधात नव्हे तर बहुजनांच्या संघटनासाठी काढू, असे आम्ही जाहीर केले. मराठा समाजाच्या मोर्चात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करा किंवा शिथिल करा, अशी मागणी पुढे आणण्यातही संघ परिवाराचा हात आहे. त्यांच्या कुटिल कारस्थानाला मराठा मोर्चातील काही लोक बळी पडले. दलित आणि मराठा समाजात भांडण लावायचा हा उद्योग आता मराठा ओबीसींपर्यंत पोहोचला आहे. बहुजन मोर्चाला मिळणाऱ्या प्रतिसादाने हादरलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा प्रस्ताव जाहीर केला. हे मंत्रालय एप्रिल महिन्यापासून अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी कोणताही अधिकारी नियुक्त केलेला नाही की निधीची तरतूद नाही. मग एवढी घाई कशासाठी? आम्ही ओबीसींना सांगू शकतो, की मंत्रालय महामंडळाच्या नादी लागू नका. तेवढ्याने ओबीसींचे भागणारे नाही. आम्ही तुम्हाला सत्ताधारी बनवू.'' 

हजरत मौलाना सज्जाद नोमाणी म्हणाले, ""सांगलीची ही दुपार भारतासाठी नवी सकाळ ठरणार आहे. हजारो वर्षांपासून भारताच्या या उज्ज्वल परंपरेचे प्रतीक म्हणजे हा मोर्चा आहे. वेशभूषा किंवा नमाज पडून नव्हे तर सच्चा मुस्लिम बनण्याचा संकल्प इथून जाताना करा. इथला मुस्लिम या देशाशी इमानदार आहे. तो या देशाचा झेंडा खांद्यावर घेऊन मरेपर्यंत सीमेचे रक्षण करणारा आहे. मुस्लिमांनी भयमुक्त होऊन मुख्य प्रवाहाचा भाग बनावे. या देशाच्या मूळ निवासींशी नाते सांगावे. या देशाचा खोटा इतिहास वर्षानुवर्षे थापला गेला.'' 

यावेळी विविध जाती संघटनांच्या नेत्यांची भाषणे झाली. मनजितसिंह, सुरेश चिखले, विवेक कांबळे, दत्तात्रय घाडगे, इम्तियाज जमादार, जयसिंग शेंडगे, पोपट पुकळे, रणजित ऐवळे, लक्ष्मण माने, शिवानंद माळी, सुमय्या नोमाणी, ऍड. के. डी. शिंदे, सुनील गुरव, असिफ बावा, शेवंता वाघमारे, अरुण खरमाटे, इंद्रकुमार भिसे, चंदन चव्हाण यांची भाषणे झाली. सभेपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनुराधा ऐदाळे, नंदा कांबळे, कल्पना कोळेकर, सलमा मोमीन, किरण रणधीर, अलका मलमे, सुषमा होवाळे, निर्मला चिखले, सुरेखा तेली, नगरसेविका शेवंता वाघमारे, वर्षा वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. 

निवेदनातील प्रमुख मागण्या... 
ऍट्रॉसिटी कायदा कडक करा, त्यासाठी स्वतंत्र न्यायालय, तपास यंत्रणा निर्माण करा 
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या 
सरकारने मुस्लिम पर्सनल कायद्यात हस्तक्षेप करू नये 
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व अल्पसंख्याक दर्जा द्या 
ख्रिश्‍चन धर्मप्रचारक, चर्चवरील हल्ले रोखा 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घ्यावा 
जैन धर्माला केंद्रीय पातळीवर अल्पसंख्याक दर्जा द्यावा 
कोपर्डी घटनेतील आरोपींना तत्काळ फाशी द्या 
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करा 
धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे 
बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ तयार करा 
ओबीसी; भटक्‍या विमुक्त जातींची जनगणना करा 
ओबीसीत अन्य जाती आरक्षणाची घुसखोरी थांबवा 
ऍट्रॉसिटीचा दुरुपयोग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करा 
भटक्‍यांनाही ऍट्रॉसिटीचा कायद्याद्वारे संरक्षण मिळावे 
वतन जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात 
मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून आरक्षण द्या 
शेतीमालाला हमीभाव द्यावा, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा 
"नीट' परीक्षा रद्द करून पूर्ववत सीईटीच सुरू ठेवावी 
सांगलीत मध्यवर्ती ठिकाणी अण्णा भाऊ साठे, जोतिराव फुले, शाहू महाराज यांचे पुतळे उभारावेत 

क्षणचित्रे 
मुख्य सभामंचाला महात्मा जोतिराव फुले यांचे नाव 
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अधिकारात बदलाविरोधात मोर्चात फलक 
सच्चर आयोगावरील पुस्तक घेऊन मोर्चात मुस्लिम तरुणांचा सहभाग 
मंचावर बापू बिरू वाटेगावकर यांचे आगमन होताच तरुणांचा जल्लोष 
मोर्चात सहभागी होणाऱ्या तरुणाईत टॅटो काढण्याची क्रेझ होती 
विविध जातींच्या नावांसह बहुजन क्रांतीचा टॅटो शरीरावर मिरवला जात होता.

Web Title: bahujan kranti morcha in sangli