बहुजन समाज पक्षाचे दिवाळीनंतर आक्रोश आंदोलन 

Solapur
Solapur

सोलापूरः केंद्र व राज्य शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या योजना कागदावरच राहिल्याने त्याचा निषेध म्हणून बहुजन समाज पक्षाच्या वतीने दिवाळीनंतर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली. 

मंजूर झालेल्या पण प्रत्यक्षात न आलेल्या योजनांचा आराखडाच त्यांनी सादर केला. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका स्वाती आवळे, ज्योती बमगुंडे उपस्थित होते. श्री. चंदनशिवे म्हणाले,""पाकणी ते जुना पुणे नाकापर्यंतच्या जलवाहिनीचे काम अर्धवट आहे, स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, घर तेथे स्वच्छतागृहाचा निधी बॅंकेत पडून आहे, समांतर जलवाहिनी योजना सोलापूरची दिशाभूल आहे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकही घर मंजूर झालेले नाही, दलितवस्तीचा निधी जाणीवपूर्वक आडवून ठेवण्यात आला आहे, महापौर व आयुक्त हे विकासकामांपेक्षा परदेश दौरा किंवा इतर दौऱ्यालाच महत्त्व देतात, शासनाच्या योजनांना त्वरीत मंजुरी द्या अन्यथा ती रद्द करू, अशी धमकीवजा इशारा देतात, दोन्ही मंत्र्यांचे समर्थक गट स्वतःच्या फायद्यासाठी एकत्रित येतात, शहरविकासासाठी एकत्रित येत नाहीत, विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असणारे विरोधी पक्षनेते सोईनुसार विरोधी पक्षाची भूमिका बजावतात.'' 

महापालिकेत सुरु असलेल्या कारभाराचा निषेध म्हणून बसपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. शहर विकासासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी वेळीच निर्णय घेतले नाहीत तर त्या विरोधातील आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असेही श्री. चंदनशिवे म्हणाले. 

पालकमंत्र्यांनी महापौरांना पाडले तोंडघशी 
सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पाणीपुरवठ्याबाबत चर्चा सुरु होती. त्यावेळी, महापौरांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री पाणी सोडण्यास तयार असताना, पालकमंत्री देशमुख यांनी, शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र पदाधिकारी व प्रशासनाचे नियोजन नाही, असे सांगत महापौरांना मुख्यमंत्र्यांसमोरच तोंडघशी पाडले होते. हा प्रकार पाहता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना शहरवासियांची किती काळजी आहे, हेच स्पष्ट झाले आहे, असेही श्री चंदनशिवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com