आमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला. त्यावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने आज पाचही आरोपींचा जामीनअर्ज मंजूर केला. 

नगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला. त्यावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने आज पाचही आरोपींचा जामीनअर्ज मंजूर केला. 

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी चौकशीसाठी आणलेले आमदार संग्राम जगताप यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये धुडगूस घातला. या प्रकरणी तीनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 44 जणांना पोलिसांनी अटक केली. आमदार शिवाजी कर्डिले, ऍड. प्रसन्ना जोशी, ऍड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर काल सुनावणी झाली. आरोपींतर्फे बाजू मांडताना ऍड. नितीन गवारे म्हणाले, की गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यांच्याकडे गुन्ह्यात वापरलेले दगड, दांडके सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा गुन्ह्यात संबंध असल्याचे स्पष्ट होत नाही. आरोपींविरुद्ध 308, 225 कलम चुकीच्या पद्धतीने लावले आहे. गुन्ह्यातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले स्वत: हजर झालेले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. केवळ सूड उगवण्यासाठी फिर्याद देण्यात आली असून, राजकीय षडयंत्र करून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. 

सरकार पक्षातर्फे बाजू मांडताना ऍड. केदार केसकर म्हणाले, की पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला हा गंभीर गुन्हा आहे. गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करावयाची आहे. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायाधीश अशोकुमार भिल्लारे यांनी पाचही आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ऍड. नितीन गवारे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे ऍड. केदार केसकर यांनी बाजू मांडली. 

गुन्ह्याला 308 कलम समाविष्ठ झाल्याने प्रथमवर्ग न्यायालयात जामीन होत नव्हता. जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळण्याच्या आशा कमी होत्या. पण, आमदार शिवाजी कर्डिले यांना जामीन मिळाल्याने आता अन्य आरोपीही जामीनासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. 

Web Title: bail to mla shivaji kardile and 5 others