सुरेश खाडे, भाजपने तुमचा कचरा केलाय 

सुरेश खाडे, भाजपने तुमचा कचरा केलाय 

मिरज - विरोधकांना पालोपाचोळा म्हणून अवमान करणारे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना त्यांच्या पक्षानेच त्यांची लायकी दाखवून दिली आहे. तीनवेळा आमदार झाल्याने पालकमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या खाडेंना साधे महामंडळही मिळालेले नाही. ज्यांचा पक्षानेच कचरा केलाय, त्यांची आमच्यावर बोलण्याची औकात नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

आमदार खाडे यांनी काँग्रेसला खोचक आवाहन करताना मिरजेत तगडा उमेदवार द्या, पालापाचोळा देऊ नका, अशी टीका केली होती. होनमोरे याआधी 2009 ला काँग्रेसकडून तर 2014 ला राष्ट्रवादीकडून लढले होते. त्यांनी खाडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, ""खाडे यांची पात्रता काय? जतला विलासराव जगताप यांच्या मेहरबानीने ते आमदार झाले. 2009 ला मिरजेत दंगल झाली आणि त्यावर ते स्वार झाले. तरुणांची डोकी भडकावून, गुणागोविंदाने नांदणाऱ्या समाजात तेढ निर्माण करून, जातीय रंग देऊन त्यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली. 2014 ला देशात थापाड्यांचे वारे आले आणि त्यात हे थापा मारूनच आमदार झाले. स्वतःचे कर्तृत्व काय? मिरज तालुक्‍याला किती निधी आणलाय? खरे आकडे सांगा, एकदा जाहीरपणे पंचनामा करूया. दरवर्षी तेच जुने खोटे आकडे सांगून लोकांना फसवायचे धंदे आता बंद करा. मिरज पूर्व भागातील बोलवाडसारख्या गावात पिण्याचे पाणी नाही, गावाला रस्ता नाही म्हणून एसटी बंद झाली. तुम्ही काय दिवे लावले ते सांगा.'' 

ते म्हणाले, ""मिरज पंचायत समितीचा सभापती कुणी ठरवला? खासदार संजय पाटील यांना तेथे येऊन बसावे लागले. त्यांनीच सभापती ठरवले, तुम्ही फक्त गुलाल लावून घ्यायला आला, ही तुमची पात्रता आहे. ही पात्रता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे तुम्ही 2014 पासून तीनवेळा नवा कोट शिवून घेतला, मात्र तो घालण्याचे भाग्य काही तुम्हाला लाभले नाही. मीच मंत्री होणार, पालकमंत्री होणार, जिल्हा चालवणार, असा आव तुम्ही आणत होता. कुठे आहे मंत्रीपद? भाजपच्या नेत्यांनी तुम्हाला चांगले ओळखले आहे. पैसे फेकून कार्यकर्त्यांनी मी विकत घेऊ शकतो, सर्व पक्षाच्या लोकांना खिशात घेऊन फिरतो, अशी तुमची भाषा आहे. ती लोकांनी जाणली आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत हाच पालापाचोळा एक होऊन तुमच्या अहंकार भस्मसात करून टाकेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com