सह्याद्रीचा वाघ हाय...या जयघाेषात बाळासाहेबांनी भरला अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

हलगीच्या तालावर निघालेल्या या रॅलीत अनेकांनी ताल धरला होता. 

कऱ्हाड ः कऱ्हाड उत्तरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार पाटील यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने होते. 

पाटील यांनी येथील मंगळवार पेठेत श्री जोतिबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर निवासस्थानी ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून रॅलीसाठी बाहेर आले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीसाठी सकाळपासूनच मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास रॅलीत जल्लोष करत कार्यकर्ते सहभागी झाले होते. "वाघ हाय... वाघ हाय... सह्याद्रीचा वाघ हाय... यासह आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी शहर व परिसर दणाणून गेला. हलगीच्या तालावर निघालेल्या या रॅलीत अनेकांनी ताल धरला होता. 

रॅलीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे आदींसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार पाटील यांचे छायाचित्र असलेल्या फलकावर "साहेब आम्ही तुमच्यासोबत' असा मजकूर लिहिला होता. दत्त चौकात रॅलीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सहभागी झाले. या वेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर निवडणूक कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लिबर्टी मंडळाच्या मैदानावर सभा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Patil filled application in karad