विखेंनी काँग्रेस सोडल्यावरच बाळासाहेबांना `अच्छे दिन`!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

राधाकृष्ण विखे पाटलांनी काॅंग्रेस पक्ष सोडला आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. विखे पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर बाळासाहेब हे विधिमंडळ काॅंग्रेस पक्षाचे नेते झाले आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळही त्यांच्या गळ्यात आली.

पुणे : राधाकृष्ण विखे पाटलांनी काॅंग्रेस पक्ष सोडला आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. विखे पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर बाळासाहेब हे विधिमंडळ काॅंग्रेस पक्षाचे नेते झाले आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळही त्यांच्या गळ्यात आली.

नगर जिल्ह्यातील नेते असलेलेे विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय स्पर्धा नवीन नाही. पक्ष सत्तेवर होता तेव्हा या दोन नेत्यांनाच त्याची फळे मिळाली. फक्त खाते कोणते हवे, यासाठी दोघांत स्पर्धा होती. दोघांनीही कृषी आणि शिक्षण खाते सांभाळले होते. बाळासाहेबांना महसूल मंत्रिपदही मिळाले. विखेंनी परिवहन, न्याय व विधी ही खातेही सांभाळली.

पक्ष 2014 च्या निवडणुकीनंतर विरोधी बाकांवर बसला. त्या वेळी विरोधी पक्षनेतेपदाची संधी विखे पाटलांना मिळाली. तरीही बाळासाहेब हे राहुल गांधी यांच्या संपर्कात राहून पक्षाची इतर राज्यांतील जबाबदारी सांभाळत होते. विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाला अचानक बाळासाहेब थोरात यांच्यावर विश्वास वाटू लागला. त्यामुळे आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

नगर जिल्हा एके काळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. आता आपल्या जिल्ह्यातच काॅंग्रेसची शक्ती वाढविण्याचे आव्हान थोरातांवर आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून थोरात यांना आता राज्यात फिरावे लागणर आहे. याचा फायदा विखे घेण्याचा धोका आहे. थोरातांच्या अनुपस्थितीत त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात विखे त्यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावणार नाहीत, याची काळजी थोरतांना घ्यावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorats Good Day after R Vikhe Patil left Congress