बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जो लोकसभेत शेतकऱ्यांसाठी बोलत असे आणि सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करत असे. अशा एका अस्सल नेत्याला आपण मुकलो आहोत.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

नगर : माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ विठ्ठलराव ऊर्फ बाळासाहेब विखे पाटील (वय 84) यांचे आज रात्री आठच्या सुमारास लोणी (जि. नगर) येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 31) दुपारी 12 वाजता प्रवरानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी सिंधूताई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण यांच्यासह तीन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे.

तब्बल सात वेळा खासदार राहिलेल्या व केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या विखे पाटील यांचा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठा दबदबा होता. त्यांचे वडील (कै.) विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सहकारी तत्त्वावरील आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरू केला. बाळासाहेबांनी पुढे सहकार चळवळ वाढविण्यासाठी काम केले.
शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील सामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यातूनच पुढे प्रवरा अभिमत विद्यापीठाची स्थापना करण्यापर्यंत या परिसराने झेप घेतली. त्यांनी स्थापन केलेल्या प्रवरा परिसरासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये देश-परदेशांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री व केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करताना विखे पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. प्रवरानगर परिसरासह जिल्ह्यातील विविध संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. नगर जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व खजिनदार, राज्य साखर संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र पाणी परिषदेचे संस्थापक, राज्य डिस्टिलरी असोसिएशनचे अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी विखे पाटील यांचे सलोख्याचे संबंध होते. नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील विरुद्ध सर्व असे समीकरण कित्येक वर्षे होते. निवडणुकीच्या काळात विखे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या "विखे पॅटर्न'ची किमया काय असेल याचे नेते, कार्यकर्ते व जनतेलाही औत्सुक्‍य असे. पाणी व दुष्काळासंदर्भात विखे पाटील यांचा अभ्यास मोठा होता. सरकारमधील मंडळीही त्यांचे अनेक वेळा मार्गदर्शन घेत असत.

राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे पाटील यांनी देशभरातील 45 खासदारांना एकत्र करून "कॉंग्रेस फोरम फॉर ऍक्‍शन' स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखविले होते. त्यातूनच पुढे 1991च्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी नगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्या निवडणुकीमुळे गाजलेला विखे-गडाख खटला जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करून गेला. या खटल्याच्या निकालामुळेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी धडाक्‍याने सुरू झाली. त्यानंतर विखे पाटील काही काळ शिवसेनेत होते. त्याचवेळी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सरकारने विखे पाटील यांच्या अनुभवाची, ज्ञानाची व कामाची दखल घेत त्यांची देश व जागतिक पातळीवरील विविध समित्यांवर नियुक्ती केली होती. केंद्र सरकारच्या संरक्षणविषयक समितीच्या अध्यक्षपदाचा त्यामध्ये समावेश होता. त्यांना 2009मध्ये "पद्मभूषण' किताबाने गौरविण्यात आले.

मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने सहकार, शिक्षण, कृषी ग्रामविकासासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे एक ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे.
- धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

बाळासाहेब विखे पाटील यांचा जीवनपट
- जन्म ः 10 एप्रिल 1932
- गाव ः लोणी, ता. राहाता, जि. नगर
- मतदारसंघ ः शिर्डी लोकसभा (पूर्वाश्रमीचा कोपरगाव. ते एकदा नगरमधूनही निवडून गेले.)
- शिक्षण ः एस. एस. सी.
- सात वेळा खासदार
- माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री
- माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

स्थापन केलेल्या संस्था
- प्रवरा ग्रामीण विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)
- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था
- प्रवरा सहकारी बॅंक
- पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशन
(नगर, नाशिक व पुणे)
- प्रवरा रुरल मेडिकल ट्रस्ट

भूषविलेली पदे
- प्रदेश कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष (1980)
- प्रदेश कॉंग्रेस समितीचे खजिनदार (1985)
- राज्य साखर संघाचे अध्यक्ष (1981)
- महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष (1977)
- महाराष्ट्र पाणी परिषदेचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष (1995)
- राज्य डिस्टिलरी असोसिएशनचे अध्यक्ष (1977)
- प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष (1966 ते 1987)

Web Title: balasaheb vikhe patil passed away