कोल्हापूरात जमावबंदी लागू; सरकारचा कातडी वाचवण्याचा प्रयत्न, विरोधकांची टीका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37(3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान सरकारच्या या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले असून, सरकार साफ अपयशी ठरले आहे. जनता यांच्या विरोधात रोष व्यक्त करणारच म्हणून स्वतःची कातडी वाचवण्याचा सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न असून या सरकारने आज इंग्रजांची आठवण करून दिली आहे. हे सरकार स्वार्थी असल्याची टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असंच विचारायची वेळ आता आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आता त्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू केली आहे. वेगवेगळे विचित्र फतवे काढून हे सरकार पूरग्रस्तांच्या संकटात वाढ करण्याचं काम करत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.

तर, पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसहित भाजप नेत्यांना मदती संदर्भात जाब विचारला याचा राग मनात धरून पूरग्रस्तांवर सरकाचा हा सूड उगवण्याचा प्रयत्न आहे. सरकार स्वतः कुठलीही मदत करायची नाही आणि इतर पक्ष व सामाजिक संघटनांनाही ती करु द्यायची नाही म्हणून सरकारने जमावबंदी केल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban orders issued in Kolhapur district till August 24