esakal | सात महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर पडले 
sakal

बोलून बातमी शोधा

Banana prices have been falling in the local market for the past seven months

गेली सात महिने झाले स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर पडल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाळवा तालुक्‍यात अलीकडील काही वर्षात नगदी पीक म्हणून कृष्णा व वारणा काठावर शेतकऱ्यांनी केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे.

सात महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर पडले 

sakal_logo
By
शामराव गावडे

नवेखेड : गेली सात महिने झाले स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर पडल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाळवा तालुक्‍यात अलीकडील काही वर्षात नगदी पीक म्हणून कृष्णा व वारणा काठावर शेतकऱ्यांनी केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे. नगद उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते. म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून केळीच्या लागवड केली आहेत. रोपे खरेदी, लागवड व्यवस्थापन एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च शेतकरी या पिकासाठी करतात. 

साधारणपणे दहा रुपयांच्या पुढे प्रति किलोला दर यापूर्वी मिळत असे. कोरोना साथ आल्यानंतर झाल्यानंतर केळीची दर पडले आहेत. ते आजअखेर वाढलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यापारी वाळवे तालुक्‍यातील केळी खरेदी करतात. ही खरेदी करताना प्रति किलो दोन ते पाच रुपये वा कमी दराने ही खरेदी केली जाते. उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहित आहे. 

व्यापारी मर्यादित असल्याने उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. अशा पद्धतीने खरेदी केलेला केळीचा माल रंपनिग चेंबरला पिकवून तो बाजारपेठेत मात्र जवळपास प्रतिकिलो दहा रुपयांच्या दरम्यान ते विकत आहेत. चार दोन दिवसांत लाखोंचा नफा हे व्यापारी मिळवत आहेत. उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या व्यापाऱ्यांवर पणन मंडळाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. 

केळीचा हमीभाव शासनाने जाहीर करायला हवा. तरच दोन रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतील. वाळवा तालुक्‍यात जवळपास सध्या 2 हजार एकरावर केळीची लागवड आहे. शेतकरी बागा काढण्याच्या मनस्थितीत आहेत. वर्षभराच्या खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना फक्त वीस - पंचवीस हजार रुपये एकरी पदरात पडत आहेत. शासकीय स्तरावर पणन मंडळाने यावर नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

मी गेली अनेक वर्षे केळी उत्पादक म्हणून काम करत आहे व्यापाऱ्यांच्या मनमनिवर पणन मंडळाचा अंकुश हवा यासंदर्भात लवकरच पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून निवेदन देणार आहे. 
- विश्वास पाटील, इस्लामपूर. 

मी पंधरा वर्षे केळीचे उत्पादन घेतो. यावर्षी प्रति किलो दोन - पाच रुपये अशा कवडीमोल दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकरी जमीनदोस्त झाला आहे. 
- सचिन पाटील, कोरेगाव.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image