केळी उत्पादकांची आर्थिक नाकाबंदी

केळी उत्पादकांची आर्थिक नाकाबंदी

दर आले ५ हजारांवर : नोटाबंदीचा परिणाम, दर पाडून मागत असल्याची तक्रार  
कोल्हापूर - नोटाबंदीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील केळी उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतरही केळीच्या दरात सुधारणा न झाल्याने केळी उत्पादक दररोजचा तोटा सहन करीत आहेत. गेल्या महिन्यात आठ ते दहा हजार रुपये प्रतिटन असणारा दर गेल्या चार दिवसांत पाच हजारांवर आल्याने केळी उत्पादकांना याचा फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे उठाव कमी असल्याचे सांगत व्यापारी दर पाडून मागत असल्याने केळी उत्पादकांची नाकाबंदी झाली आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नात घट 
गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका संपन्न समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रालाही बसला. विशेष करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील बागायती पट्टाही यामुळे बाधित झाला. परिणामी केळी उत्पादनात मोठी घट झाली. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये होणारी केळीची लागवडही झाली नाही. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांतच अडीच हजार एकरांपर्यंत केळीचे पीक वाढले होते; पण गेल्या वर्षी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी केळीकडे दुर्लक्ष केले. 

ऊसवाढीचा केळीला फटका 
यंदा पाऊस चांगला झाल्याने केळीची लागवड जास्त होईल, अशी अपेक्षा होती; पण उसाला चांगला दर मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने दोन वर्षांपूर्वी केळी केलेल्या शेतकऱ्यांनी यंदा उसाला प्राधान्य दिले. यामुळे रोपवाटिकांतून होणारी केळीची मागणीही घटली. यंदा पाऊस चांगला होऊनही केळीची लागवड न झाल्याने अडीच हजारांवरून हे क्षेत्र केवळ एक हजार एकरांच्या आसपास आले आहे. 

वाढत्या दराला नोटाबंदीचा घुणा 
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड आणि उत्पादन कमी असल्याने दर चांगले होते. नोटाबंदीच्या अगोदर स्थानिक व बाहेरच्या बाजारपेठांमध्येही केळीचे दर वधारले होते. सातत्याने आठ ते नऊ हजार तर क्वचित प्रसंगी दहा हजार रुपयांवरही दर  गेला; पण नोटाबंदीचा निर्णय झाला आणि इतर भाजीपाल्याप्रमाणे केळीलाही त्याचा फटका बसला. मागणी नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी केळी खरेदीस फारसा उत्साह दाखविला नाही. परिणामी दर घसरत गेले. केळी दर श्रावणाव्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यातही तेजीत असतात. यंदा चांगला दर घेण्याची संधी आली होती; पण दुर्दैवाने नोटबंदीचा घुणा लागल्याने तीही हिरावली गेल्याने उत्पादक हताश बनला आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा दर चांगले असल्याने यंदा केळी उत्पादकाला चांगला दर मिळत होता; परंतु नोटाबंदीनंतर अचानक पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत दर घसरले. उत्पादक तर अडचणीत आलाच; परंतु नवीन लागवडही कमी झाली. यंदा केळी लागवड कमी असल्याने पुढील वर्षी दर चांगला मिळू शकेल; पण सध्या नोटबंदी हेच किमती घसरण्याचे खरे कारण ठरत आहे. 
- विश्‍वास चव्हाण, सीमा बायोटेक, तळसंदे

दर पाडून मागण्यामुळे केळी उत्पादकांना त्रास होतोच; पण नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना आयतेच कोलित मिळाले आहे. माल खपत नसल्याचे कारण सांगत व्यापारी कमीत कमी किमतीला केळी विकत घेत आहेत. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसल्याने त्याला नाइलाजाने स्थानिक बाजारात केळी विकावी लागत आहेत. 
- मदन देशपांडे, प्रदेश मंत्री, भारतीय किसान संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com