बॅंक कर्मचारी मंगळवारी संपावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मागण्या काय
- मोठ्या थकीत कर्जदारांवर कारवाई
- कर्ज थकविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी
- नोटाबंदीमुळे बॅंकांना नुकसानभरपाई द्यावी
- नोटांबदीत केलेल्या कामाचा मोबदला द्यावा
- बॅंकांतून पुरेशा प्रमाणात नोकर भरती

कोल्हापूर - युनाटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सच्या झेंड्याखाली एकत्र आलेले देशभरातील 10 लाख बॅंक कर्मचारी मंगळवारी (ता. 28) एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. सरकारच्या कर्मचारीविरोधी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकिंगविरोधी धोरणाविरोधात हा संप असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, नॅशनल कॉन्फ्रेडरेशन ऑफ बॅंक एम्प्लाईज, बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स कॉंग्रेस या संघटनांचा समावेश असून, 10 लाख बॅंक कर्मचाऱ्यांपैकी 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी होतील.

आऊट सोर्सिंग बंद करावे, बॅंक कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या निवृत्तिवेतन योजनेत सुधारणा कराव्यात. बॅंकांच्या संचालक मंडळावरील कर्मचारी तसेच अधिकारी प्रतिनिधींच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. या मागण्यांचा समावेश आहे. संपकरी कर्मचारी 17 ते 27 फेब्रुवारीला निदर्शने करणार असून, 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या राजधानीत धरणे कार्यक्रम करणार आहेत. 22 फेब्रुवारीला बिल्ले लावून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील बॅंकिंग क्षेत्र आज अडचणीत आले आहे. सामान्य माणसाची बचत अडचणीत आली असून अर्थव्यवस्था अडचणीत येऊ पाहात आहे. अशा कसोटीच्या वेळी बॅंक कर्मचारी पुढाकार घेऊन संघर्ष करून आम जनतेचे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नंदकुमार चव्हाण, राजेंद्र गडकरी, गुरुनाथ मुजुमदार, सूर्यकांत कर्णिक आदी उपस्थित होते.

मागण्या काय
- मोठ्या थकीत कर्जदारांवर कारवाई
- कर्ज थकविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी
- नोटाबंदीमुळे बॅंकांना नुकसानभरपाई द्यावी
- नोटांबदीत केलेल्या कामाचा मोबदला द्यावा
- बॅंकांतून पुरेशा प्रमाणात नोकर भरती

Web Title: bank employee strike