बॅंक वसुली पथकांना झोडपून काढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

सातारा - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे एकरकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे बॅंकांची कर्जे थकली आहेत. आता वसुली पथकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यातून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास कारखाना व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील, तसेच वसुली पथकांना झोडपून काढले जाईल. यासाठी सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एफआरपीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. कांद्याचे भाव पडलेले असताना कांदा रस्त्यावर फेकून दाखवणाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील कायद्याप्रमाणे एफआरपीची रक्कम दिलेली नाही. दूध संघांनी शासनाकडून लिटरमागे पाच रुपये अनुदान घेतले आहे. पण, शेतकऱ्यांची गळचेपी दूध संघांकडून थांबलेली नाही.

जिल्ह्यातील प्रमुख दूध संघांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचा गोविंद दूध संघ, काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा स्वराज दूध संघ, सोनाई दूध संघ या सर्वांनी पाच रुपये अनुदान घेऊनही दूध दर वाढवून देण्यास विरोध केला आहे. कोल्हापुरातील गोकूळ दूध संघ, वारणा, चितळे दूध संघाला शेतकऱ्यांना पैसे वाढवून देण्यास जमते. पण, सातारा जिल्ह्यातील दूध संघ दरवाढीसाठी तयार नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांची माती करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली सुरू केली असून शेतकऱ्यांशी बॅंकेचे वसुली अधिकारी उध्दटपणे बोलत आहेत. याबाबत बॅंकेचे व्यवस्थापक, अध्यक्षांकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत. पण, त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे एक जानेवारीपर्यंत एकरकमी एफआरपी, दूध उत्पादकांना योग्य दर द्यावा, अन्यथा जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंका आणि सोसायट्यांच्या कर्जाचा एक रुपयाही भरला जाणार नाही. वसुली अधिकाऱ्यांनी बापाचे मळे विकून शेतकऱ्याला कर्ज दिल्यासारखे वागू नये.

या त्रासातून कोणी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास बॅंकांचे वसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू तसेच वसुली पथकांना झोडपून काढू.

गोडसे लोकसभेसाठी इच्छुक....
गेली २० ते २२ वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत, असे सांगून शंकरराव गोडसे यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्यातील जनतेने मान्यता दिल्यास सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी तयार असल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Bank Recovery Scoud Shankarrao Godase FRP