कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील बॅंकफोडीचा छडा

कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील बॅंकफोडीचा छडा

कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार व्हायचे. कोणाला संशय येऊ नये म्हणून निवाऱ्यासाठी ट्रकचाच आधार घेणाऱ्या चोरट्यांच्या या टोळीचा पर्दाफाश झाला. टोळीतील दोघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेल्या गॅस सिलिंडरसह ट्रक जप्त केला. मुख्य सूत्रधारासह पाच जणांचा शोध सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अटक केलेल्या संशयितांची नावे - ट्रकचालक चाँदखान अब्दुलनबी नईमखान (वय ४०, मूळ रा. दांतागंज, बदायू, उत्तर प्रदेश, सध्या रा. इंदिरानगर, अंधेरी पूर्व), त्याचा भाऊ गुड्डू ऊर्फ तसददुअल्ली अब्दुलनबी नईमखान (३८) अशी आहेत. टोळीतील अन्य संशयित असे - सूत्रधार बाबू कौसर खान, गुड्डू ऊर्फ कालिया इसराकअल्ली खान, फसाहत ऊर्फ तहजीब आलम खानकल्लुखान, सेहवाज खान (चौघे, रा. ककराला, जि. बदायू, उत्तर प्रदेश) आणि राहुल (दांतागंज).

दरम्यान, दोघा संशयितांना आज कळे-खेरिवडे न्यायालयात हजर केले. न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. जंगमस्वामी यांनी त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशेष सरकारी वकील वर्षा माने-खोत यांनी संशयितांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

यशवंत सहकारी बॅंक फोडून दोन किलो ४४४ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह आठ लाखांची रोकड असा ७४ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार आठ फेब्रुवारीला उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून याचा तपास सुरू होता. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके होती.

तपासादरम्यान बॅंकेजवळून पांढरा ट्रक या भागातून गेल्याचे निदर्शनास आले. त्याचा क्रमांक समजू शकला नाही. पोलिसांनी मुंबईतून या ट्रकचा क्रमांक शोधून काढला. त्याचा मालक भिवंडी येथील चांदखान नईमखान असल्याचे स्पष्ट झाले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी त्याने भिवंडी येथील भाडेतत्त्वावरील घराचा पत्ता वापरल्याचे पुढे आले. 

उत्तर प्रदेशात गॅस कटरच्या आधारे चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळ्या असल्याचे पोलिसांना समजले. तेथील ककरा या गावातील टोळीने कृत्य केले असल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांचे पथक तेथे गेले. तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर टोळीतील संशयित गुड्डू खानला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ट्रक मालक हा भाऊ चाँदखान असल्याचे सांगितले. तसेच बॅंक सात साथीदारांनी फोडल्याची कबुली दिली.

त्यानंतर भिवंडी येथून त्याचा भाऊ चाँदखान व गुड्‌डूला ट्रकसह कोल्हापुरात आणले. चौकशीत टोळीचा म्होरक्‍या बाबू खान असून त्यात गुड्‌डू ऊर्फ कालिया, फसाहत ऊर्फ तहजीब, सेहवाज खान व राहुलचा समावेश असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गॅस सिलिंडर, दोन कटावण्या आदीसह ट्रक जप्त केला.

ऑक्‍सिजन व घरगुती सिलिंडरचा वापर
संशयित गुड्डू खान गॅस कटिंगचे काम करतो. लोखंडी लॉकर तोडण्यासाठी घरगुती गॅस व ऑक्‍सिजन सिलिंडरचा एकत्रित गॅस वापर या टोळीने केला. त्यासाठी लागणारे ऑक्‍सिजनचे सिलिंडर कर्नाटकातून चोरल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली. 

बाबूकडून चोरीच्या ऐवजाची वाटणी
चोरलेला मुद्देमाल घेऊन टोळी ट्रकने मुंबईला जात होती. तेथे ऐवजाची वाटणी बाबू करायचा. ऐवज घेऊन जो तो उत्तर प्रदेशातील आपल्या घरी जात होता. टोळीतील इतर पाच संशयित पसार आहेत. त्यांना पकडल्यानंतर ऐवज कोणाला विकला हे शोधून तो जप्त केला जाईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

बाबू खान आठ महिने कळे परिसरात
टोळी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र अशी मालवाहतूक करायची. एस.आर.एल. नावाच्या रोडलाईन्स कंपनीचा त्यांनी आधार घेतला होता. सूत्रधार बाबू खान त्या त्या परिसरात टेहळणी करून बॅंकेची निवड करायचा. त्याच्यावर परराज्यात पाच गुन्हे नोंद आहेत. बॅंक फोडण्यापूर्वी आठ महिने अगोदर तो कळे येथील एका गुऱ्हाळघरावर काम करत होता. त्याने यशवंत बॅंकेच्या शाखेची रेकी करून साथीदारांसह हात साफ केल्याचे तपासात पुढे आले.

रजईचा वापर...
गॅस कटरने लॉकर फोडताना त्याचा उजेड बाहेर जाऊ नये, यासाठी संशयित रजईचा (जाड चादर) वापर करत होते. त्यांच्याकडून एक रजई पोलिसांनी जप्त केली आहे. बॅंक फोडण्यापूर्वी कळे परिसरात दोन दिवस गुन्ह्यात वापरलेला ट्रक थांबून होता. मालवाहतूक ट्रक असून त्यावरील आपण कामगार आहोत, असे त्यांनी भासविण्याचा प्रयत्न केला होता, असेही तपासातून पुढे आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com