आजपासून बॅंका स्वीकारणार नोटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - केंद्र सरकारने चलनातून बाद ठरवलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा उद्यापासून सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांसह जिल्हा बॅंक, अर्बन बॅंकांच्या सर्व शाखा व पोस्टाच्या सर्व कार्यालयांत स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येकाकडून चार हजार रुपयेच स्वीकारून तेवढीच रक्कम त्यांना परत दिली जाईल. यापेक्षा जास्त रक्कम संबंधितांना आपल्या बॅंकेच्या खात्यावर जमा करता येणार आहे. 

कोल्हापूर - केंद्र सरकारने चलनातून बाद ठरवलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा उद्यापासून सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांसह जिल्हा बॅंक, अर्बन बॅंकांच्या सर्व शाखा व पोस्टाच्या सर्व कार्यालयांत स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येकाकडून चार हजार रुपयेच स्वीकारून तेवढीच रक्कम त्यांना परत दिली जाईल. यापेक्षा जास्त रक्कम संबंधितांना आपल्या बॅंकेच्या खात्यावर जमा करता येणार आहे. 

दरम्यान, नव्या 500 रुपयांच्या नोटा बॅंकांत उपलब्ध होईपर्यंत बॅंकांकडून सध्या त्यांच्याकडे असलेल्या 100, 500 व 20 रुपयांच्या नोटा संबंधितांना परत दिल्या जाणार आहेत. 500 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून शुक्रवारी जिल्ह्यात उपलब्ध होतील, असे सांगण्यात येते. त्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार आहे. 

काळा पैसा रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या चलनातील 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय काल जाहीर केला. मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. या निर्णयाने देशभर खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आज जिल्ह्यातील सर्वच बॅंकांचे कामकाज ठप्प होते. या बॅंकांकडून त्यांच्याकडे 500 व 1000 रुपयांच्या किती नोटा आहेत याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला हवी आहे. ही माहिती संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. संबंधित बॅंकांना ई-मेलद्वारे आपल्याकडी या नोटांचा तपशील रिझर्व्ह बॅंकेला द्यावा लागणार आहे. 

उद्यापासून सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांसह जिल्हा बॅंकेसह नागरी बॅंकांच्या शाखांत नियमित वेळेत जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. एका व्यक्तीकडून केवळ 4 हजार रुपयांच्या नोटाच स्वीकारल्या जातील. ज्यांचे खाते एखाद्या बॅंकेत आहे व त्यांना जादा पैसे भरायचे झाल्यास ते खात्यावर भरू शकतात फक्त त्यांना चार हजार रुपयेच परत मिळतील. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. ज्यांचे बॅंकेत खाते नाही; पण त्यांना नोटा बदलून हव्यात त्यांनी बॅंकेतील एक फॉर्म भरून चार हजार रुपयांच्याच नोटा बदलून मिळणार आहेत. 

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील बॅंकिंग 

राष्ट्रीयीकृत्त, खासगी बॅंका - 32 

त्यांच्या शाखा - 357 

जिल्हा बॅंक - 1 

जिल्हा बॅंकेच्या शाखा - 191 

नागरी बॅंका - 54, शाखा-अंदाजे - 200 

पतसंस्था - 2200 

बाहेरच्या जिल्ह्यातील बॅंकांच्या शाखा - 100 

खात्यावरून आठवड्याला 20 हजार 

ज्या ग्राहकांचे खाते बॅंकेत आहे, त्या खात्यावर 4 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कितीही रक्कम त्यांना चलनाद्वारे भरता येणार आहे. त्यासाठी बॅंकेतील इतर फॉर्म भरून देण्याची गरज नाही. अशा खात्यावरून संबंधितांना एकावेळी 10 हजार, तर आठवड्याला 20 हजार रुपये चेक, डिमांड ड्राफ्टसारख्या माध्यमातून काढता येणार आहे. 

व्यवहार करा कार्डद्वारे 

बॅंकांकडे पैशाची उपलब्धता होईपर्यंत व सर्व व्यवहार सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच व्यवहार करावे लागणार आहे. याशिवाय पुढील तारखेचे धनादेशही यासाठी वापरता येतील. 

"केडीसी'त 27 कोटीच्या नोटा 

रिझर्व्ह बॅंकेने आज देशभरातील सर्वच बॅंकांना व्यवहार बंद ठेवून त्यांच्याकडे असलेल्या 500 व 1000 हजार नोटांचा तपशील तातडीने पाठवण्याचे आदेश दिले. आज सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सर्वच बॅंकांत हे कामकाज सुरू होते. जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत 500 व 1000 च्या 27 कोटी रूपयांच्या नोटा आहेत. यात दहा कोटी रूपये 500 च्या तर 17 कोटी रूपयांच्या नोटा 1000 च्या आहेत. बॅंकेच्या 191 शाखांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Banks accept notes from today