बॅंकांना सुटी, एटीएमला कुलूप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - तीन दिवसांपासून एटीएमवर पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. दोन हजार रुपयापर्यंतच पैसे काढावे लागत असले तरी जेवढे मिळतात तेवढे पदरात पाडून घेतले जात असताना आज मात्र बॅंकांनी सुटी घेतली. तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक एटीएम मशीन बंद राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

कोल्हापूर - तीन दिवसांपासून एटीएमवर पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली आहे. दोन हजार रुपयापर्यंतच पैसे काढावे लागत असले तरी जेवढे मिळतात तेवढे पदरात पाडून घेतले जात असताना आज मात्र बॅंकांनी सुटी घेतली. तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक एटीएम मशीन बंद राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

रविवारी ज्या पद्धतीने बॅंकांच्या व एटीएम मशीनच्या दारात पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या, तशा रांगा क्वचितच दिसल्या. बॅंकांनी कार्यालय बंद ठेवत एटीएम मशीनही बंद ठेवली आहेत. विशेष म्हणजे यातील प्रत्येक मशीनसमोर बंदूकधारी सुरक्षा रक्षक उभा केला आहे. जिल्ह्यात 30 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत आहेत. पण ही नोट बाजारात घेऊन गेल्यानंतर त्याचे सुटे मिळणार कुठे, हाही मोठा प्रश्‍न ग्राहकांसमोर आहे. 

एटीएममधून चार ते साडेचार हजार रुपये शंभर रुपयांच्या नोटा मिळणारे आनंद व्यक्त करत आहेत, पण ज्यांना दवाखाने, मेडिकल किंवा इतर अत्यावश्‍यक कामासाठी जास्त पैसे लागणार आहेत त्यांच्याकडे मात्र सरकारच्या निर्णया विरुद्ध संताप व्यक्त करण्यापलीकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. सुट्या पैशांचा प्रश्‍न निर्माण झाल्याने भाजी मंडईसह कापड दुकान, सौंदर्य प्रशासने, धान्य दुकान, गॅस, चित्रपट गृह, भांड्यांची दुकाने यांसह मोठ्या मॉलमध्येही लोकांची गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. 
हजार रुपयांच्या जुन्या नोटा खिशात असूनही अनेकांना बस व रिक्षाने प्रवास करता येत नाही. मध्यवर्ती बस स्थानक ते शहरातील प्रमुख ठिकाणी पायीच चालत जावे लागत आहे. प्रवाशांना परत देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने रिक्षा, टांगा, टॅक्‍सीवाल्यांचा व्यवसायही थंडावला आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालून जास्ती-जास्त बॅंक, एटीएमधून पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे. गावागावांत असणाऱ्या बॅंकांमध्येही मोठी गर्दी होत आहे, पण एटीएम मशीन अद्यापही सुरू केलेली नाहीत. पालिकांच्या ठिकाणी एक दोन एटीएम मशीन सुरू आहेत, पण तेथे पैसे काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गावातील लोक शहरात येऊन पैसे बदलून किंवा काढण्यास प्राधान्य देत आहे. याचा विचार अग्रनी बॅंकेने केला पाहिजे. बॅंक सांगते सर्वांना पैसे मिळतील. दुसरीकडे रक्कम संपल्याने रांगेत उभे राहणाऱ्या शेकडो ग्राहकांना पैशाविना परत जावे लागत आहे. 

प्रत्येक बॅंकेची गावागावांत शाखा सुरू होत आहेत. या शाखेच्या ठिकाणी एटीएम मशीन बसवली आहेत. पण ती सुरू नसल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅंकेने गावागावांतील आपली एटीएम मशीन सुरू केली पाहिजेत. 
विश्‍वजित पाटील, ग्राहक

Web Title: Banks holidays, ATM lock