esakal | बापट मळा उद्यान भाड्याने देणे आहे...

बोलून बातमी शोधा

 Bapat mala garden is for rent ...

सांगली शहरातील मध्यवर्ती भागात असलेले झाडांनी नटलेले बापट मळा, महावीर उद्यान चक्क विवाह, स्वागत समारंभ आणि मेळाव्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचे दर फलक गेले दोन दिवस या उद्यानाच्या बाहेर लावल्यानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.

बापट मळा उद्यान भाड्याने देणे आहे...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : शहरातील मध्यवर्ती भागात असलेले झाडांनी नटलेले बापट मळा, महावीर उद्यान चक्क विवाह, स्वागत समारंभ आणि मेळाव्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचे दर फलक गेले दोन दिवस या उद्यानाच्या बाहेर लावल्यानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले असून महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल बापट मळा उद्यान प्रेमींनी एका निवेदनाद्वारे केला आहे. या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासाठी आजपासून सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

बापट मळा हा गेल्या 25 वर्षांपासून सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचा भाग राहिला आहे. कॉंग्रेसची सत्ता असताना या उद्यानावर कोट्यवधीचा खर्च होऊनही खाबुगिरीबामुळे याची वाट लागली होती. हे उद्यानाचे आजचे जे स्वरूप आहे ते होण्यासाठी महापालिकेत सत्तांतर व्हावे लागले होते. महाआघाडीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालून पुण्याच्या नामांकीत कंपनीला हे उद्यान विकसीत करण्यासाठी दिले होते. या उद्यानाचा कायापालट करण्याचे आश्‍वसन महाआघाडीने पूर्ण केल्याबद्दल मोठा सोहळाही या उद्यानात झाला होता.

शहराच्या मध्यवस्तीत लोकांना ऑक्‍सिजन देणारे हे एकमेव उद्यान आहे. या ठिकाणी पूर्वी आवोजावो घर तुम्हारा अशी अवस्था होती. चार ठिकाणी उद्यानाला वाटा होत्या. लोक रस्त्यासारखा वापर करत होते. दत्तात्रय मेटके आयुक्‍त असताना त्यांनी या उद्यानालाही कडक शिस्त लावली. बापट मळा व अमराई ही दोन उद्याने म्हणजे सांगलीचे वैभव आहे. या ठिकाणी महापालिकेने सुशोभीकरण करुन तेथे ट्रॅक तयार करुन नागरिकांना व्यायामासाठी चांगली सोय केली आहे. त्यामुळे नव्याने वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपला जर विकास कामे जमत नसतील तर त्यांनी करू नयेत पण आहे त्या उद्यानांची वाट लावू नये अशी अपेक्षा लोक व्यक्‍त करत आहेत. 

दर फलकाने नागरिकांमध्ये आश्‍चर्य 
गेले दोन दिवस या ठिकाणी महापालिकेने उद्यान भाड्याने देण्यासाठी दर पत्रकाचा फलकच लावला आहे. यामध्ये वाढदिवस, विवाह, स्वागत समारंभ, मेळावा, प्रदर्शन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सिने शुटींग याचे दर प्रसिध्द करण्यात आले आहेत. हा फलक पाहून नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त झालेच शिवाय या निर्णयाविरोधात संतापजनक भावनाही व्यक्त होत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरु केली आहे. आज सुमारे तिनशेवर नागरिकांनी स्वाक्षरी करुन या निर्णयाला विरोध केला आहे. 

महासभेत चर्चा फक्त फोटोग्राफीची 
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी 20 डिसेंबर रोजी झालेल्या सभेत हे उद्यान फोटोग्राफीसाठी देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी वाढदिवस, विवाह, स्वागत समारंभ, प्रदर्शन आदींचा उल्लेखही झाला नव्हता. पण, आता त्याच महासभेच्या मान्यतेचा दाखला देत हे उद्यानच भाड्याने देण्याचा प्रकार समोर आला आहे. 

प्रतिक्रिया : 
फोटोशॉफीसाठी दर आकारण्याशिवाय कुठल्याही गोष्टीची चर्चा महासभेत झाली नव्हती. गेल्या दहा वर्षात हे उद्यान नागरिकांनी जपले आहे. त्याचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडणार. उत्पन्नवाढीसाठी हे उद्यान भाड्याने देता, मग रविवारी सुटी दिवशी महापालिका इमारत भाड्याने देणार का? 

- दिग्विजय सुर्यवंशी (नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस) :

हे दर फलक कल्पद्रुम आणि वाडीकर मंगल कार्यालयाचे आहेत. बापट उद्यानात विवाह, स्वागत समारंभ, प्रदर्शन असे कार्यक्रम होणार नाहीत. केवळ फोटोग्राफीसाठी दर आकारण्याबाबत महासभेत निर्णय झाला होता. याबाबत उद्यान विभागाशी चर्चा करुन तो फलक काढून ठेवला आहे. 

- लक्ष्मण नवलाई (नगरसेवक, भाजप) :

फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया 

भारती ओऊळकर : या उद्यानात फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. हे उद्यान विविध समारंभ, विवाहास भाड्याने दिल्यास नागरिकांच्या व्यायाम, विरंगुळ्यात अडथळा येणार आहे. अशा कार्यक्रमांमुळे उद्यानाचे नुकसान होऊ शकते. हे उद्यान महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. 

नियाज मुजावर : बापट उद्यानात आमचा हास्य क्‍लब आहे. येथे विवाह, वाढदिवसासारखे कार्यक्रम झाल्यास उद्यान खराब होईल. डॉल्बी लावला जाईल, कचरा होईल, जेवणाचे खरकटे पडल्याने त्याचाही त्रास होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा विरोध आहे. 

स्मिता दोशी : या उद्यानात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला येतात. त्यांना फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी हे सुरक्षित आणि नैसर्गिक ठिकाण आहे. त्यामुळे येथे सकाळी, सायंकाळी गर्दी असते. मात्र कार्यक्रमांना भाड्याने दिल्यास या गोष्टींवर परिणाम होण्याची भिती आहे. उत्पन्नवाढीसाठी उद्यान भाड्याने देण्यापेक्षा दुसरे मार्ग महापालिकेने शोधावेत.