सभापती राष्ट्रवादीचा अन्‌ सत्ता भाजपची 

सुदर्शन हांडे
बुधवार, 15 मार्च 2017

बार्शी - बार्शी पंचायत समितीच्या 12 जागांपैकी सात जागा जिंकत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. तर पाच जागा व त्यात सभापतिपदाचे आरक्षण असलेल्या दोन्ही जागा जिंकून या वेळी सभापतिपद राष्ट्रवादीकडे घेण्यात आमदार दिलीप सोपल यांना यश आले आहे. सभापती राष्ट्रवादीचा अन्‌ सत्ता भाजपची असे त्रांगडे पुढील अडीच वर्षे राहणार आहे. 

बार्शी - बार्शी पंचायत समितीच्या 12 जागांपैकी सात जागा जिंकत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. तर पाच जागा व त्यात सभापतिपदाचे आरक्षण असलेल्या दोन्ही जागा जिंकून या वेळी सभापतिपद राष्ट्रवादीकडे घेण्यात आमदार दिलीप सोपल यांना यश आले आहे. सभापती राष्ट्रवादीचा अन्‌ सत्ता भाजपची असे त्रांगडे पुढील अडीच वर्षे राहणार आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बार्शी तालुक्‍यात पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात कॉंटोकी लढत पाहायला मिळाली होती. मागील 15 वर्षांपासून म्हणजेच 2002 पासून पंचायत समितीवर राऊत यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यांनी पंचायत समितीची सत्ता दोनदा शिवसेना तर एकदा कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवून सत्ता मिळवली होती. या निवडणुकीतही ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत पंचायत समितीच्या सात तर जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडवर केलेले पक्षांतर, मतदारांपर्यंत जाण्यास मिळालेला अपुरा वेळ अशाही स्थितीत राऊत यांना पंचायत समितीवर काठावर सत्ता मिळवण्यात यश आले आहे. असे असले तरी अतिआत्मविश्‍वासामुळे पंचायत समिती सभापतिपदाचा उमेदवाराचा पराभव तसेच जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोनने घटली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून पंचायत समितीच्या सत्तेपासून लांब असलेल्या राष्ट्रवादीने या वेळी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. आमदार दिलीप सोपल यांनी सभेतील भाषणातून विरोधकांवर आक्रमक टीका करत ग्रामीण भागात चांगले वातावरण निर्माण केले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केवळ सोपल यांच्या एकट्याच्या चमत्कारावर अवलंबून राहिली. पंचायत समितीवरील सत्ता मिळवण्यासाठी चांगले वातावरण व सुवर्णसंधी असूनही पक्‍के नियोजन नसल्यामुळे ऐनवेळी राऊत गटाने मुसंडी मारत पंचायत समितीवरील सत्ता टिकवली. 

पंचायत समिती सभापतिपद हे अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षित असून राष्ट्रवादीने सासुरे व वैराग या दोन्ही गणातून अनुसूचित जाती महिला उमेदवार उभा करत दोन्ही जागा जिंकल्या आहेत. सभापतिपदाला संधी देताना राष्ट्रवादीने राऊत गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सासुरे गणात धक्‍कादायक फेरबदल करणाऱ्या कविता वाघमारे यांना संधी दिली आहे. नूतन सभापती उच्चशिक्षित असून त्यांनी बीकॉम पूर्ण केलेले आहे. तसेच निरंजन भूमकर यांनी वैरागच्या उमेदवाराचा सभापतिपदासाठीचा आग्रह न धरता सोपल जो सभापती करतील तो मान्य आहे असे सांगून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता बसल्यास स्वत:च्या मातोश्रीसाठी जिल्हा परिषदेतील एखाद्या खात्याच्या सभापतिपदाचा दावा मजबूत केला आहे. तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी उपसभापतिपदासाठी तालुक्‍यातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले अविनाश मांजरे यांची उपसभापतिपदी निवड केली आहे. राऊत यांच्या राजकारणात देवगाव हे प्रकर्षाने चर्चेत राहिले असून याच गावातील युवा नेतृत्व असलेल्या अविनाश मांजरे यांची उपसभापती निवड करून राऊत यांनी त्या भागातील विरोधकांच्या एकहाती वर्चस्वाला सुरूंग लावला आहे. 

पहिल्याच दिवशी वाद 
सत्ता भाजपची अन्‌ सभापती राष्ट्रवादीचा अशा अवघड स्थितीत पंचायत समितीचा कारभार पुढील अडीच वर्षे चालणार आहे. पहिल्याच दिवशी सभापती-उपसभापती केबिनवरून किरकोळ वाद निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला होता. सत्तेच्या या अशा विचित्र स्थितीत व राजकारणात पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र पुढील अडीच वर्षे मोठी गोची होणार आहे. 

Web Title: Barshi panchyat samittee