दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

बार्शी (सोलापूर) - घातक हत्यारासह वाहनातून येऊन गावानजीक संशयितरीत्या थांबलेल्या सहा दरोडेखोरांना फपाळवाडीकरांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. सरपंच रामहारी फपाळ यांना गावातून फिरणाऱ्या एका स्कॉर्पिओ वाहनाचा संशय आला होता. नंतर हे वाहन ओढ्याच्या पुलापासून काही अंतरावर थांबले होते. त्यात सहाजण होते.

ग्रामस्थांनी त्यातील पाच जणांना रस्त्यावर येताच पकडले. तर, वाहनाच्या चालकाने तेथून पलायन केले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सदर संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, पांगरी पोलिसांनी तावडी गावातून संशयितांचे वाहन पकडले. त्यात लोखंडी कोयता, कटावणी, हेक्‍सॉ ब्लेड, साचा, मिरचीपूड आढळून आली.

Web Title: barshi solapur news robber arrested