राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत 'बार्शी'चा झेंडा 

संतोष सिरसट
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माढा तर उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अक्कलकोट तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले नाही. एवढेच नाही तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शिक्षक नेतेही तोंडघशी पडल्याचे निकालावरून दिसते. 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शी तालुक्‍याने झेंडा फडकावला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये बार्शी तालुक्‍यातील तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माढा तर उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अक्कलकोट तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले नाही. एवढेच नाही तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शिक्षक नेतेही तोंडघशी पडल्याचे निकालावरून दिसते. 

18 फेब्रुवारीला पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील 48 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी 22 हजार 402 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. प्रत्यक्षात परीक्षेसाठी 21 हजार 896 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी पाच हजार 450 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 17 विद्यार्थी राज्यस्तरावर झळकले. तर जिल्ह्यातील 645 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पाचवीचा निकाल 24.89 टक्के लागला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या निकालात वाढ झाली आहे. मागील वर्षीचा निकाल 20.40 टक्के होता. 

आठवीच्या परीक्षेसाठी 13 हजार 816 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 13 हजार 536 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील दोन हजार 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 31 विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविला. या परीक्षेत 607 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. जिल्ह्याचा निकाल 15.31 टक्के लागला. मागील वर्षीचा निकाल 15.19 टक्के इतका होता. माढा, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील एकही विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकला नाही. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी अभिनंदन केले आहे. 

सोलापूर शहराचीही बाजी 
सोलापूर शहरातील 10 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे. त्यामध्ये आठवी व पाचवीच्या परीक्षेत प्रत्येकी पाच मुलांचा समावेश आहे. बार्शीच्या खालोखाल सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या यादीत स्थान मिळविले आहे. 

राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले तालुकानिहाय विद्यार्थी कंसात पाचवीचे विद्यार्थी : 
बार्शी-13 (2), मोहोळ-2 (0), सांगोला-8 (3), माळशिरस-2 (0), पंढरपूर-1 (1), उत्तर सोलापूर-1 (1), मंगळवेढा-1 (3), सोलापूर शहर-5 (5), एकूण-31 (17) 

राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या पाचमध्ये आलेले विद्यार्थी :

पाचवी परीक्षा - वैष्णवी लेंगरे-द. ह. कवठेकर प्रशाला पंढरपूर, आस्था घुले, समृद्धी गायकवाड-नगरपालिका मुलांची शाळा नंबर चार मंगळवेढा. 

आठवी परीक्षा - अक्षय जाधव-सुलाखे हायस्कूल बार्शी, ओंकार चोळ्ळे-अण्णाभाऊ साठे प्रशाला मोहोळ, केदार ढेपे-बी. एफ. दमाणी प्रशाला सोलापूर, हर्षवर्धन गायकवाड-न्यू हायस्कूल वडाळा, ता. उत्तर सोलापूर, ज्ञानेश्‍वरी पाटील-इंग्लिश स्कूल मंगळवेढा, आयुष मुंदडा-इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Barshi Solapurs Students Top In Scholarship Exam in Maharashtra State