बसस्थानकासमोरील कुंटणखान्यावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी ही एकत्रितपणे ही कारवाई केली.

नगर : नगर शहरातील बसस्थानक परिसरात छुप्या पद्धतीने कुंटणखाने चालविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी ही एकत्रितपणे ही कारवाई केली. पोलिसांनी कुंटलखान्यावर छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. 

पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्‍या व्यवसाय चालतो अशी माहिती मिटके यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे गैरप्रकार आढळून आला. वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी शहर व परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईचे छापासत्र सुरू केले आहे. त्यामुळे अवैध धंदे चालक चांगलेच धास्तावले आहेत. सावेडी परिसरातील व भिस्तबाग उपनगरातील कुंटणखान्यावर छापेमारी करत व्यवसाय बंद केला. शहरातील हायप्रोफाईल भागांतील वेश्‍या व्यवसायावरही पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. 

बसस्थानक परिसरात वेश्‍या व्यवसाय 
सायंकाळनंतर पुणे बसस्थानक व माळीवाडा बसस्थानक परिसरात वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिला रात्री थांबतात. रात्री उशिरापर्यंत या परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी व वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर असतो. यातून पुरुषांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बसस्थानकांतील सामान्य प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाकडून या महिलांवर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Basasthānakāsamōrīla kuṇṭaṇakhān'yāvara chāpā