esakal | बावाफन उरूस रद्द : त्रिपुरारी पौर्णिमेला मालगावात शुकशुकाट 
sakal

बोलून बातमी शोधा

Bawafan Urus canceled: Tripurari Pournima in Malgaon

शेकडो वर्षांपासून दिवाळीनंतरच्या त्रिपुरारी पौर्णिमेला येथील बावाफन दर्ग्याच्या उरुसास होणारी गर्दी यावर्षी कोरोनामुळे मालगावकरांना प्रथमच दिसली नाही.

बावाफन उरूस रद्द : त्रिपुरारी पौर्णिमेला मालगावात शुकशुकाट 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मालगाव (जि. सांगली) : शेकडो वर्षांपासून दिवाळीनंतरच्या त्रिपुरारी पौर्णिमेला येथील बावाफन दर्ग्याच्या उरुसास होणारी गर्दी यावर्षी कोरोनामुळे मालगावकरांना प्रथमच दिसली नाही. कोरोनामुळे उरुसावर यावर्षी पोलिस प्रशासनाने बंदी घातल्याने प्रत्येक वर्षी लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या मालगावमध्ये यावर्षी मात्र शुकशुकाट पहावा लागतो आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण येथून हजारो भाविक बावाफन दर्ग्याच्या उरुसास येतात. यामुळे किमान दहा दिवस गाव गजबजलेले असते. या कालावधीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह गावातील स्थानिक व्यापारऱ्यांचीही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. सर्व जाती-धर्माचे लोक यासाठी मोठ्यासंख्येने येतात.

दिवाळी सणातील पाडव्यादिवशी या उरुसाच्या नियोजनाची बैठक गावाच्या चावडीवर होते. याच बैठकीत कार्यक्रम आणि अन्य बाबींचे नियोजन केले जाते. परंतु पोलिस प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार उरूस यात्रांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर या बैठकीस उपस्थित असलेल्या गावच्या कारभाऱ्यांना जड अंतकरणाने उरूस रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

केवळ काही धार्मिक विधीना प्रशासनाने परवानगी दिली आणि शुक्रवारपासून (ता. 27) दर्ग्याच्या परिसरात फिरण्यास भक्तांना मनाई केली. सहाजिकच आज (सोमवारी) उरुसाचा पहिला दिवस असूनही, शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच शुकशुकाट पाहायला मिळाला. गावातील वयोवृद्ध मंडळींनी त्यांच्या पाहण्यातील हा पहिलाच अनुभव असल्याचे सांगितले.

यावर्षीचा उरूस हा असा सुनासुना असल्याने गावात कुठेही पाहुणेरावळे अथवा आप्तेष्टांना ग्रामस्थांनी बोलावलेले नाही. याशिवाय उरुसातील छोट्यामोठ्यांना खरेदीचा आनंदही घेता आला नाही. केवळ धार्मिक विधी आणि देवाला घरातून नमस्कार करण्यावरच मालगावचे ग्रामस्थ समाधान मानत आहेत. 

संपादन : युवराज यादव

loading image