रक्षेसाठी पाचशेची नोट द्यावी लागते..."कोविड'च्या आपत्तीत स्मशानवाटेवरही "बाजार'

covid smashanbhoomi.jpg
covid smashanbhoomi.jpg

सांगली- कोरोना रुग्णाचं सांगलीतील खासगी रुग्णालयात निधन झालं. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मिरजेला नेण्यात आला. चार आप्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. नातलगांनी निदान रक्षाविसर्जनासाठी रक्षा मिळावी, अशी विनंती केली. उपस्थित अधिकाऱ्यांनी रक्षा मिळणार नाही, असं बजावलं. अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याने नातलगांना खुणावले. नातलग दुसऱ्या दिवशी मिरजेत मिशन चौकात गेले. फोन करताच कर्मचारी आला. हातावर पाचशेची नोट ठेवताच राख घेऊन तो धावत परत आला. 

सांगलीतील वसंतदादा कारखान्याजवळील एका कुटुंबाच्या वाट्याला आलेला हा प्रसंग. आपला माणूस जातो. त्याचे अंत्यदर्शनही घेता येत नाही. धार्मिक विधीही नाहीत. निदान रक्षाविसर्जन करता यावं, यासाठी या कुटुंबाची ही धडपड. मात्र, अशा संकटकाळातही निबरट यंत्रणा इथेही संधी शोधते. कोरोना आपत्तीने माणसे शरीराने नव्हे, तर मनानेही खचली आहेत. खचलेलं मन अधिक धर्म-परंपरात शरण होतं. विवेक सुटतो आणि कर्मकांड फोफावतं. मग स्मशानातही असा बाजार भरतो. 
या बाजाराचं आणखी एक उदाहरण. अंत्यसंस्कारासाठी म्हणून महापालिकेने अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी सुरक्षा पीपीई किट दिले आहेत. दफनविधीसाठी जागा आणि सुविधा कब्रस्थानच्या विश्‍वस्तांकडून दिली जाते. तासगावमधील एका मुस्लिम रुग्णाचा मिरजेत मृत्यू झाला. पार्थिव दफनविधीसाठी तासगावमध्ये नेण्यात आले. त्यासाठी सहा पीपीई किट देण्यात आली. त्यासाठी 400 रुपयांप्रमाणे दोन हजार 400 रुपये घेण्यात आले. पीपीई किट महापालिकेची आणि रक्कम घेणारे सेवाभावी (?) कार्यकर्ते. ही रक्कम त्यांनी का घेतली? उत्तर नाही. संधी मिळाली की असे चोहोबाजूंनी लुटीचे जाळे पसरले जाते. 

आणखी एक उदाहरण सांगलीजवळच्या धामणीतीलं. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. सांगलीतील सिव्हिल परिसरातून रुग्णवाहिका मागवण्यात आली. शहरातील चार रुग्णालये धुंडाळली आणि शेवटी मिरज रस्त्यावरील एका रुग्णालयात नंबर लागला. बेड मिळाला. रुग्णवाहिका चालकाने 12 हजार रुपये बिल केले. चांगले चार-दोन तास मृत्यूसोबत फिरायची ही "फी' असं त्यानं सांगितलं. त्याचं खरं होतं. आज आप्तही सोबत यायला तयार नाहीत, तिथं हा रुग्णवाहिकावाला पुढे आला. हेच नशीब. देवरूपातील डॉक्‍टरही रुग्ण पाहायला तयार नाहीत किंवा दाखल करायला हॉस्पिटल्स मिळत नाहीत. अशा वेळी आपलं माणूस वाचविण्यासाठीची ही धडपड. 
प्रसंग तीन वेगवेगळे. व्यथा समान. अंत्यसंस्कार करणारे, रुग्णवाहिका चालविणारे किंवा सेवेसाठी स्वतःहून पुढे आलेले लोक... अशा संकटकाळात देवदूतच. जीवाशी खेळून ते सेवा बजावत आहेत. त्याचवेळी अशा आपत्तीतही माणुसकीला नख लावणारे अनेक प्रसंग सभोवती घडत आहेत. नियमात यंत्रणा गुरफटलेल्या असतात. त्यातून जमिनीवर माणसं कोणत्या समस्येला तोंड देत आहेत, हे पाहायला या यंत्रणेला सवडच नाही. कोविडच्या विळख्यातील अनेक कुटुंबांना असे अनुभव पदोपदी येत आहेत. दुःख हे की त्यावर तूर्त उपाय नाही. 



""अंत्यसंस्कारासाठी काम करायला आमचे कर्मचारीच तयार नाहीत. कसेबसे चार कर्मचारी काम करतात. त्यांच्यावर खूप ताण आहे. रक्षा विक्रीसारखे प्रकार कोण करीत असतील, तर ते आमचे कर्मचारी नक्की नाही. कोणीतरी त्रयस्थच असा उद्योग करीत असावा. महापालिकेचा त्या लोकांशी कोणताही संबंध नाही.'' 
- स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका 
.......... 
""मृत्यूपश्‍चात विधींच्या सर्व धर्मांत श्रद्धा-प्रथा आहेत. माणुसकी या प्रथांमधूनच पुढे जात असते. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव योग्य दक्षता घेऊन थेट स्मशानभूमीत नेऊन नातलगांच्या उपस्थितीत धार्मिक विधीची मुभा दिली पाहिजे, अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.'' 
- शेखर माने, नेते, शिवसेना 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com