सावधान... तुमच्या हातून सायबर क्राइम होत नाही ना!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

स्वातंत्र्यदिनी राज्यात 44 ठिकाणी सायबर क्राइम लॅब सुरू झाली आहे. प्रत्येक गुन्ह्यात कोठेना कोठे मोबाईल किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या लॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत होणार आहे. शहर आणि जिल्हापातळीवर या लॅबची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित झाल्याने आता सायबर क्राइम करणारे लोक पोलिसांच्या जाळ्यात सहज सापडतील.
- बाळसिंग रजपूत, अधीक्षक, सायबर क्राइम सेल 

राज्यात 44 ठिकाणी सुरू झाले सायबर क्राइम लॅब; गुन्हा करणारे सहज जाळ्यात
सोलापूर - चोऱ्या, घरफोड्या, अवैध व्यवसाय, वाहतूक नियोजन, महिला सुरक्षा यासोबतच पोलिसांना अलीकडे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात अनेक अडचणी येत होत्या. स्वातंत्र्य दिनापासून राज्यात 44 ठिकाणी सुरू झालेल्या सायबर क्राइम लॅबमुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेची ताकद वाढली आहे. अत्याधुनिक सुविधांमुळे आता सायबर क्राइम करणारी व्यक्ती सहज पोलिसांच्या जाळ्यात येणार आहे.

हातातल्या स्मार्टफोनमुळे खेड्यापाड्यांत इंटरनेट सुविधा पोचली. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरसह सर्व सुविधा सहज वापरल्या जात आहेत. इंटरनेटचा गैरवापर करून गुन्हा करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. बॅंक खाते हॅक करून पैसे काढणे, ऑनलाइन खरेदी करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात 44 ठिकाणी सायबर लॅबची सुरवात झाली आहे.
 

इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण व पद्धतीही वाढल्या आहेत. क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. "सी-डॅक‘ या संस्थेने राज्यातील 44 सायबर क्राइम लॅबचे काम पूर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी सायबर लॅबचा उपयोग होणार आहे. सायबर क्राइम व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, अधीक्षक बाळसिंग रजपूत हे राज्यातील सर्व सायबर क्राइम लॅबवर नियंत्रण ठेवून आहेत.

 

Web Title: Be careful not ... your hand is not the cyber crime!