कऱ्हाडकरांनाे एटीएममधून पैसे काढताय... सावधान...

हेमंत पवार
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

  कऱ्हाडला लुटण्याच्या प्रकरांमध्ये वाढ; पिन चोरूनही काढले जाताहेत पैसे.

कऱ्हाड ः शहरातील बहुतांश बॅंकांच्या एटीएममधील सुरक्षा बेभरोसे झाली आहे. अनेक एटीएमला सुरक्षा रक्षकच नाहीत, तर काही एटीएममध्ये एका वेळी पाच ते सहा जण जात असल्याने "प्रायव्हसी'च राहिलेली नाही. त्यातून एटीएमची पिन चोरून पैसे परस्पर काढणे, पैसे काढल्यानंतर कुणी किती पैसे काढले हे पाहून त्याचा पाठलाग करून पैसे लुटणे यासह अनेक गंभीर प्रकार सध्या सुरू आहेत.
 
येथील काही बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याच्या आणि काढण्याच्या दोन्ही मशिन आहेत. तेथे व्यवहारासाठी दोन मशिनवर दोन जणच जाणे नियमानुसार गरजेचे आहे. मात्र, तेथे पाच ते सहा जण जात असतात. त्यादरम्यान एखादा नवखा, ज्येष्ठ नागरिक, महिलेस हेरून त्यांना मशिनमधील माहिती देत त्यांचा पिनकोड चोरण्याचे प्रकार घडत आहेत. येथे काल एका युवतीला पैसे काढताना मदत करण्याच्या बहाण्याने तिचा पिनकोड चोरून हातचलाखी करत तिला बोगस बंद असलेले कार्ड देऊन तिचे कार्ड संबंधिताने स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर काही वेळाने संबंधित युवतीच्या खात्यातून तब्बल नऊ हजार रुपये संबंधिताने काढले. त्यासंदर्भात संबंधित युवतीला माहिती कळाल्यावर तिने तक्रार देण्यासाठी कऱ्हाड पोलिसांत धाव घेतली.

त्याबरोबर एटीएममधून कोण किती पैसे काढतो आहे, हे हेरून संबंधित चोरटे त्या व्यक्तीचा पाठलाग करतात. त्याला अडवून मारहाण करून त्याच्याकडून पैसे काढून घेत असल्याचेही प्रकार घडले आहेत. हे सर्व संबंधित एटीएममध्ये सुरक्षिततात राहिली नसल्याने घडत आहेत. त्याचबरोबर अनेक बॅंकांनी एटीएम सुरू केले आहेत. मात्र, तेथे सुरक्षा रक्षकच नेमलेले नाहीत. मध्यंतरी एटीएममधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तेथे सुरक्षा रक्षक नेमले होते. मात्र, अलीकडे अनेक बॅंकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे चोरट्यांवर कोणाचीच दहशत राहिलेली नाही. त्याचबरोबर असे प्रकार घडले तरी पोलिसांची झंझट मागे नको म्हणून अनेक जण तक्रारी देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अशा लुटारूंचे चांगलेच फावते आहे. संबंधित प्रकार टाळण्यासाठी बॅंका आणि पोलिसांनीच आवश्‍यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

कऱ्हाड शहर व परिसरातील बॅंका आणि पतसंस्थांनी आपल्या एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. एटीएमची सुविधा दिली म्हणजे झाले असे होत नाही. त्यासाठी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा यांसह अन्य आवश्‍यक त्या उपाययोजना केल्याच पाहिजेत. ग्राहकांची सुरक्षितता हे पहिले कर्तव्य आहे. त्याचा विचार सर्व एटीएमधारक बॅंकांनी करणे गरजेच आहे.

- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be carefull while withdrawing money from ATMs centers in Karad