कॅशलेस व्यवहाराची मानसिकता तयार करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

कोल्हापूर : नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेवर आलेल्या परिस्थितीचा विचार करता कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहारासाठीची मानसिकता तयार केली पाहीजे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

कोल्हापूर : नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेवर आलेल्या परिस्थितीचा विचार करता कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहारासाठीची मानसिकता तयार केली पाहीजे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

जिल्हा बॅंकेच्या वतीने कॅशलेस व्यवहाराबाबत कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेत श्री. मुश्रीफ बोलत होते. मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक भवनमध्ये दोन सत्रांत ही कार्यशाळा झाली. यात नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक, राज्य बॅंक असोशिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वाती पांडे, तज्ज्ञ संचालक डॉ. तराळे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, ''नोटाबंदीमुळे जिल्हा बॅंकेची वाटचाल अडचणीतून सुरू आहे. आमच्या पातळीवर बॅंकेसाठी प्रयत्न सुरू आहेत; पण मार्च 2017 चे पाच हजार कोटींच्या ठेवी, 100 कोटींचा नफा व 10 टक्के नक्तमूल्य करण्याचे उद्दिष्ट गाठायचे झाल्यास कॅशलेस व्यवहाराकडे बॅंक कर्मचाऱ्यांनी वळले पाहीजे. बॅंकेने ग्राहकांच्या सेवेसाठी तालुका पातळीवर 36 एटीएम, 20 कॅश रिसायकलर मशीन्स बसवण्याचे ठरवले आहे. गावपातळीवर दुकानदार, व्यापारी, शेतीसेवा केंद्र, खरेदी-विक्री संघ आदी ठिकाणी कॅशलेससाठी 'पॉज' मशीन्स दिली जाणार आहेत.'' 

ते म्हणाले, ''बॅंकेच्या आधारस्तंभ असलेल्या विकास सोसायट्या, दूध संस्था व बचत गटांकडे 'मायक्रो एटीएम' यंत्र दिले जातील. चेस्ट करन्सी बॅंकांकडून होणारा अपुरा चलन पुरवठा लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी स्वतः स्थानिक व्यापारी, दुकानदार, पेट्रोल पंपचालक यांच्याशी संपर्क साधून रोकड गोळा करून ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करावा.'' 
श्री. चव्हाण म्हणाले, ''बॅंकेच्या 2 लाख 70 हजार कर्जदार शेतकऱ्यांना रुपे कार्ड दिले जाणार आहे. बॅंकेमार्फत 'ई-कॉमर्स' सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे बॅंकेचे कार्डधारक ऑनलाइनही खरेदी करू शकणार आहेत. यात कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.'' 

कार्यशाळेला बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक माजी खासदार श्रीमती निवेदीता माने, भैया माने, आर. के. पोवार, विलास गाताडे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, उदयानी साळुंखे आदी उपस्थित होते. 

जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी पारंपरिक व्यवहाराची मानसिकता बदलायला पाहिजे. आपल्याबरोबरच ग्राहकांनाही कॅशलेस व्यवहारासाठी प्रवृत्त केले, तर बॅंकेसमोरील आर्थिक अडचणी कमी होतील. ग्राहकांनाही यासंदर्भात बाजारात असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. 

- सौ. स्वाती पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य बॅंक असोशिएशन

Web Title: Be ready for Cashless transactions, says Hasan Mushrif