
Bealgaum : बेळगाव - खानापूर मार्गावर लवकरच टोल,वाहन दराचे फलक उभारले; अंमलबजावणीबाबत अनिश्चितता
खानापूर - बेळगाव- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गणेबैल (ता. खानापूर) येथे टोलवसुलीचे दरफलक लावले आहेत. टोलवसुलीचे दर निश्चित केले. विविध वाहन प्रकार, एकेरी व दुहेरी टोल दर अशी वर्गवारी करून फलक उभे केले आहेत. मात्र, टोलवसुली केव्हापासून याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही.
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम नाशिक येथील अशोका इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे सुरू आहे. रस्ता रुंदीकरण, वृक्षारोपण, दिवाबत्ती, सेवा रस्ते, उड्डाणपूल, अंडर ब्रीज आदी कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे टोलवसुलीची लगबग सुरू झाली आहे.
एका फलकावर विविध वाहन प्रकार आणि त्यासाठी एकेरी आणि दुहेरी प्रवासाचा टोल दर अशी वर्गवारी केली आहे. तसेच आणखी एक मोठ्या फलकावर राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, सेना दलाचे अधिकारी, रुग्णवाहिका यासह कोणाकोणाला टोल भरण्यापासून सवलत आहे त्याचा तपशील नमूद आहे.
वास्तविक स्थानिक रहिवाशांना टोलपासून मुक्त केले आहे का? याबाबत उत्सुकता होती.मात्र त्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण नाही. या भागातील प्रभूनगर, निट्टुर, काटगाळी, इदलहोंड, सिंगीनकोप, अंकले, गणेबैल, हत्तरगुंजी, फुलेवाडी ग्रामस्थांची गोची झाली आहे.
शेतवाडीला जाण्याबरोबरच खानापूर शहराकडे स्थानिक वाहनधारक दररोज ये-जा करतात. त्यामुळे या स्थानिक वाहनधारकांना टोलनाक्याच्या भूर्दंड रोजच बसणार काय? असा प्रश्न पडला आहे. आतापर्यंत महामार्गात गेलेल्या जमीनधारकांना त्रास सहन करावा लागला. या पाठोपाठ आता चारचाकी वाहनांना टोल नाक्याचा त्रास होणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.