कुशिरेत पोलिसाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

रांगेत उभे राहण्यावरून वाद; सरपंचांची अटकेनंतर सुटका

रांगेत उभे राहण्यावरून वाद; सरपंचांची अटकेनंतर सुटका
पोहाळे तर्फे आळते (जि. कोल्हापूर) - कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी 10 वाजता कोडोली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजित शिपुगडे यांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर कोडोली येथील शासकीय रुग्णालण्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुशिरेचे सरपंच विष्णू पाटील यांना तातडीने अटक करण्यात आली. त्यांची दुपारी सुटका केली.

घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गावातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज मतदान शांततेत सुरू होते. कॉन्स्टेबल शिपुगडे मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या सूचना करत होते. यातून त्यांचा एका मतदाराशी वाद झाला. शिपुगडे यांनी मतदाराला काठी मारली. त्याचा जाब विचारत असताना दोघांत पुन्हा शाब्दिक चकमक वाढत गेली. याचा राग येऊन मतदारांच्या जमावाने शिपुगडे यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात ते जखमी झाले. घटनेची माहिती महिला पोलिस परवीन मुल्ला यांनी कोडोली पोलिसांत दिली. पोलिस निरीक्षक विकास जाधव तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर काही काळ मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसले. दुपारनंतर मतदानास गती आली.

Web Title: beating to police in kushire