esakal | गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मारहाण 
sakal

बोलून बातमी शोधा

rahuri crime

कोरोनामुळे इचलकरंजी येथे यंत्रमाग कारखाना बंद पडला. त्यामुळे परप्रांतीय कुटुंबांची उपासमार सुरू झाली. दोन ट्रकमधून मजुरांचा समूह इचलकरंजी येथून भिलवाडा (राजस्थान) येथे लपूनछपून जात होता.

गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मारहाण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुरी : घराच्या ओढीने दोन ट्रकमधून गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना काल (शनिवारी) दुपारी दीड वाजता नगर-मनमाड महामार्गावर देवळाली प्रवरा हद्दीत गुहा शिवेजवळ स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केली. त्यात अनेक जण जखमी झाले. वाट दिसेल तिकडे सर्वांनी पळ काढला. 

कोरोनामुळे इचलकरंजी येथे यंत्रमाग कारखाना बंद पडला. त्यामुळे परप्रांतीय कुटुंबांची उपासमार सुरू झाली. दोन ट्रकमधून मजुरांचा समूह इचलकरंजी येथून भिलवाडा (राजस्थान) येथे लपूनछपून जात होता.

हेही वाचा - अब कोई भुखा नही रहेगा

तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या मजुरांना किमान पाणी प्यायला मिळेल, या हेतूने काल (शनिवारी) दुपारी दीड वाजता नगर-मनमाड महामार्गावर देवळाली प्रवरा हद्दीत गुहाच्या शिवेजवळ एका ढाब्यावर दोन्ही ट्रक थांबले. काही जण उतरत असतानाच, तरुणांचे टोळके हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावले. त्यांना पाहून परप्रांतीय मजूर घाबरले. त्यांनी हात जोडले. "आम्ही काही केले नाही.

आम्हाला मारू नका,' अशी विनवणी केली; परंतु स्थानिक तरुण ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी लाठ्या-काठ्यांनी त्यांना अमानुष मारहाण केली. काही जणांनी वाट फुटेल तिकडे पळ काढला. याबाबत खबर मिळताच पोलिसांनी दोन्ही ट्रकचालकांसह 42 परप्रांतीयांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना मारहाण करणारे मात्र मोकाट सुटले. 


तरुणांनी परप्रांतीयांना काल (शनिवारी) मारहाण केली, हे खरे आहे. त्यातील काही जखमी आहेत. मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- सचिन बागूल, सहायक पोलिस निरीक्षक, राहुरी